सामाजिक संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सुप्रीम टोलनाक्याचे गैरव्यवहार : डीएसपी चौक ते कोल्हार रस्ता दुरुस्तीचे काम सुरू

नगर – सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीत नगरमधील डीएसपी चौक ते कोपरगाव दरम्यान देहरे गावाजवळ सुप्रिम कंपनीचा टोलनाका सुरू आहे. या रोडवर असंख्य खड्डे पडले आहेत. त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या बांधकाम कंपनीचे रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कंपनीला शासनाने ठरवून दिलेले निकष पूर्णपणे पायदळी तुडवले जात आहेत. याबाबत चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जन आधार सामाजिक संघटनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येऊन रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या रोडच्या दुरुस्तीबाबत जागतिक बॅंक प्रकल्प अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांच्या जिल्हाधिकारी यांच्यासमवेत दोन बैठका झाल्या. त्यानुसार कोल्हार येथून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, डीएसपी चौकापर्यंत रस्ता दुरुस्ती केली जाणार आहे. वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यासाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

नगर-कोपरगाव रोडवरील सुप्रीम टोलनाक्‍याच्या बेजबाबदार व अंतर्गत गैरव्यवहार, तसेच खराब रस्त्याच्या दुरुस्तीबाबत जनआधार सामाजिक संघटनेच्यावतीने निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले होते. यानंतर कार्यवाही होऊन या रस्त्याचे दुरुस्ती कामे हाती घेण्यात आले आहे. या कामाची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, वजीर सय्यद, अजय सोलंकी, गणेश गारुडकर, महेश घोगरे, साधना गुगळे, मंगल मोरे आदींनी पाहणी केली.

नगर-कोपरगाव रोडवर असंख्य खड्डे आहेत. दोन रोडच्या दरम्यान दुभाजकाची दुरावस्था झाली आहे. रस्त्याच्या मध्ये व बाजूने असणारे सुरक्षा पट्टे नाहीत, दिशादर्शक फलक व स्वयंचलित दिवे नाहीत, टोल कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र नाही, तसेच टोल वसूली कर्मचाऱ्यांना शासनाने ठरवून दिलेले पोशाख नाहीत. या सर्व दुर्लक्षित कारणांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात होती. अखेर हे काम सुरू झाले असून, नियमानुसार काम करावे, वाहतूक सुरक्षा फलक लावावेत, यामध्ये हलगर्जीपणा केल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारून टोलवसूली बंद करावी लागेल, असे पोटे यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)