दुष्काळात पाण्यावरून राजकारण नको

नगर : मुळा धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तन संदर्भात सिंचन भवन येथे आयोजित बैठकीत बोलताना आमदार शिवाजी कर्डिले.

कर्डिले : मुळा धरणातून दोन आवर्तने सोडण्याचे नियोजन; जायकवाडी पाण्याबाबत मुख्यमंत्र्यासमवेत बैठक

नगर – यावर्षी 1972 पेक्षाही भयानक दुष्काळ आहे. त्यामुळे मुळा धरणातून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचे योग्य आणि व्यवस्थित नियोजन करावे. दिवाळीत शेतीसाठी आवर्तन सोडण्याबाबत जलसिंचन विभाग सकारात्मक आहे. दुष्काळात पाण्याचे राजकारण न करता जायकवाडीला सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत नगर, नाशिक आणि मराठवाड्यातील लोक प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत दोन दिवसात संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुळाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या दोन आवर्तनाच्या नियोजनार्थ नगर येथील सिंचन भवनामध्ये शुक्रवारी (ता.26) अधिकारी कर्मचाऱ्यां समवेत बैठक घेण्यात आली. आमदार शिवाजी कर्डिले, आमदार बाळासाहेब मुरकूटे, माजी आमदार पांडुरंग अभंग, कार्यकारी अभियंता आर. टी. मोरे बैठकीला उपस्थित होते. मुळा धरणातील सध्याच्या उपलब्ध पणी साठ्याच्या नियोजनाचा आराखडा बैठकीत मांडण्यात आला.

राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव परिसराच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार दिवाळीत आवर्तन सोडले तरच पिके वाचतील. धरणात पाणी कमी आहे. आवर्तने व्यवस्थित सोडल्यास पिके वाचतील त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व पाणी वापर संस्थांमध्ये समन्वय आवश्‍यक आहे. सध्या पाण्यासाठीचे राजकारण जोरात चालू आहे. प्रत्येकजण आपण शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे भासवत आहे. परंतु यावर राजकारण करणे योग्य नसल्याचे मत उपस्थितांनी मांडले.

जायकवाडीला पाणी सोडण्याचा फायदा कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झाला. आता तेच पाणी जाऊ द्यायचे नाही, असे म्हणत आहेत. परंतु आता आरोप-प्रत्यारोप करण्यात काहीच अर्थ नाही. 1972 पेक्षा भयानक दुष्काळ असून शेतकऱ्यांना खरीप व रब्बी पिके गमवावी लागली आहेत. त्यामुळे राजकारण न करता सर्व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भौगोलिक परिस्थिती सध्याचे पाणी याचा आढावा घेऊन शासन स्तरावर निर्णय व्हावा, असे मत यावेळी मांडण्यात आले. जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी नगर-नाशिकच्या लोकप्रतिनिधींचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्यावे, अशी अपेक्षा आहे, असेही कर्डिले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)