जायकवाडी आवर्तनाबाबत न्यायालयात दाद मागावी

शेतकरी संघर्ष समितीच्या तातडीच्या बैठकीत निर्णय; तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

अकोले  – जायकवाडी आवर्तनासंदर्भात तातडीने न्यायालयात दाद मागावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. आज शेतकरी संघर्ष समितीची अकोले येथे तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. अजित नवले होते. अकोले तालुक्‍यात जलसाठे पुरेसे आहेत, या निकषामुळे तालुक्‍याला दुष्कळाच्या यादीतून वगळले आहे. मात्र आज त्याच जलसाठ्यांतील पाणी दुष्काळाच्या नावाखाली इतर तालुक्‍यांची नेले जात आहे. या पार्श्वभूमीवर अकोले येथे तातडीची बैठक झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड, अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, यशवंत अभाळे व संबंधितांना समितीची ही मागणी कळविण्यात आली आहे. निळवंड्याचे पाणी सोडण्याच्या आत न्यायालयात दाद मागितली पाहिजे. उशीर झाल्यास तालुक्‍याला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा डॉ. नवले यांनी यावेळी दिला.
पाणी आहे म्हणून दुष्काळ यादीतून वगळायचे आणि पुन्हा पाणीही घेऊन जायचे, हा तालुक्‍यावर अन्याय आहे. अगस्ती कारखाना व तालुक्‍यातील सर्व सहकारी संस्थांनी या संदर्भात तातडीने न्यायालयात दाद मागावी, अशी मागणी संघर्ष समितीने यावेळी केली.

निळवंडेच्या उच्चस्तरीय कालव्यांच्या प्रश्न ऐरणीवर आणण्याची हीच रास्त वेळ आहे. अंबड, धामणगाव आवारी, वाशेरे सारखी गावे उच्चस्तरीय कालवे पूर्ण न झाल्याने दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत आहेत. निळवंडेचे पाणी इतर तालुक्‍यांना सोडण्याचा प्रश्न तीव्र झाला असताना उच्चस्तरीय कालव्यांमधून या कोरडवाहू गावांना पाणी देण्याचा प्रश्न अत्यंत अग्रक्रमाने व तीव्रतेने मांडण्याची आवश्‍यकता आहे, असे अगस्तीचे संचालक महेश नवले म्हणाले.

दुष्काळ व पाणी प्रश्नी कारखाना व सहकारी संस्थानी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी व निळवंडचे पाणी इतर दुष्काळी भागात सोडण्याअगोदर तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करण्यासंबंधाने न्यायालयात हरकत दाखल करावी, अशी संघर्ष समितीच्या वतीने शांताराम गजे यांनी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)