झगडेफाटा ते वडगाव फाटा रस्त्याची दूरवस्था

निकृष्ट कामामुळे पुन्हा स्थिती जैसे थे; साईडपट्ट्याही खराब झाल्याने अपघातांत वाढ

रांजणगाव देशमुख – कोपरगाव-संगमनेर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या तसेच पुणे-इंदूर, अशा महत्त्वाच्या रस्त्याची झगडे फाटा ते वडगाव फाटादरम्यान खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली होती. मागील काही दिवसांपूर्वी रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र अल्पशा पावसामुळे हा रस्ता पुन्हा खराब झाला आहे. या रस्त्यावरचा प्रवास लोकांच्या जीवावर बेतणारा ठरत असून, खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे कंत्राट विविध ठेकेदारांना देण्यात आले होते. यामध्ये रस्त्याचे काम अनेक ठिकाणी गुणवत्तापूर्ण न झाल्याने वाहनधारकांमध्ये मोठी नाराजी आहे. रस्त्याला अनेक ठिकाणी साईडपट्ट्या राहिलेल्या नाहीत. तसेच खड्ड्यांमधून रस्ता शोधताना अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

हा राज्य महामार्ग म्हणून मंजूर असलेला रस्ता पुणे-इंदूर अशा मोठ्या शहरांतील वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीच्या तुलनेत हा रस्ता लवकरात लवकर चौपदरी होणे गरजेचे आहे. सध्या सुरू असलेल्या वाहतुकीच्या तुलनेत हा रस्ता अपुरा पडत आहे. रस्ता जड वाहतुकी योग्य नसतानाही नगर-मनमाड रस्त्याने जाणारी सर्व जड वाहतूक झगडे फाटा- तळेगावमार्गे वळवण्यात आली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे असून, या वळणांवर अनेक अपघात झालेले आहेत. शहापूर फाट्यावरील छोट्या पुलाचे कठडे तुटल्याने येथे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अनेक ठिकाणी गतिरोधक, फलकही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना गतिरोधाकांचा अंदाज येत नसल्यामुळे नेहमी अपघात होत आहेत. कायम ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना खराब रस्त्याचा मोठा त्रास होत असून, अनेकांना पाठदुखीचा व मणक्‍याचा त्रास होत आहेत. काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या अपूर्ण राहिलेल्या रस्त्याच्या कामात लक्ष घालून हा रस्ता दर्जेदार व वाहतुकीयोग्य करावा, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)