लेखी आश्वासनानंतर लोकशाही विचारमंचचे आंदोलन स्थगित

नगर – शहरातील परवानाधारक रिक्षा चालकांवर होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ लोकशाही विचार मंचच्या वतीने सोमवार दि.8 ऑक्‍टोबर रोजी पुकारण्यात आलेले आंदोलन शहर वाहतुक शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या लेखी आश्‍वासनाने स्थगित करण्यात आले आहे.

शहर वाहतुक शाखेचे पो.नि. अविनाश मोरे यांनी सदर लेखी आश्‍वासन विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष सोमा शिंदे यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी आकाश खर्पे, दिनेश रुद्रे, बाळासाहेब वाघ, तुकाराम तोगे, आदिनाथ गर्जे, कैलास डरांगे, जालिंदर सोलाट, हेमंत आकडे, अशोक सावंत, सागर लोखंडे, दिपक सग्गम, राहुल ठोकळ, दिनेश म्हेत्रे, विशाल बडे, राजू अंबेकर आदींसह परवानाधारक रिक्षा चालक उपस्थित होते.

-Ads-

शहरात परवानाधारक रिक्षांवर बेकायदेशीररित्या कुठलीही पूर्वकल्पना न देता अनेक रिक्षांवर कलम 283 प्रमाणे कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालया समोर नुकतेच निदर्शने करुन, सोमवारी रिक्षा आनून कुटुबियांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या कारवाईमुळे आर्थिक दुर्बल घटक असलेल्या रिक्षाचालकांचा रोजगार बुडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. अनेक रिक्षाचालकांनी कर्ज काढून नवीन रिक्षा घेतल्या आहेत. व्यवसाय करुन ते कर्जाचे हप्ते भरत असतात.

मात्र या कारवाईमुळे बॅंकेचे हप्ते भरणे देखील अवघड बनले असून, रिक्षा चालकांनाच लक्ष्य केले जात असल्याचे संघटनेचे म्हणणे होते. शहर वाहतुक शाखेच्या वतीने सर्वच वाहनांवर 283 प्रमाणे कारवाई चालू असून, नागरिकांच्या हितासाठी ही कारवाई चालू आहे. अपघात होईल अशा प्रकारे वाहन लावणाऱ्यांवर छायाचित्र घेऊन पुराव्यानिशी कारवाई केली जाणार असल्याचे लेखी आश्‍वासन शहर वाहतुक शाखेच्या वतीने देण्यात आल्याने सदर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)