अकोल्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी लावा – आ.पिचड

अकोले – अकोले तालुक्‍याची 50 पैशापेक्षा कमी आणेवारी लावावी, अशी मागणी आ.वैभवराव पिचड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनद्वारे केली आहे. मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनाही मागण्याच्या निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

अकोले तालुक्‍यात धरणाचा परिसर वगळता मुळा, प्रवरा व आढळा खोऱ्यात पाऊस न झाल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करावा व आणेवारी निश्‍चित करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या पिकांची पीक आणेवारी 54 ते 55 पैसे लावलेली आहे. त्यामुळे तालुक्‍याच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे. त्यांना न्याय देण्यासाठी गावनिहाय फेरसर्व्हेक्षण करुन पीक आणेवारी 50 पैसे पेक्षा कमी लावण्यात यावी, अशी मागणीही आ. पिचड यांनी केली.

-Ads-

रिमझिम पावसाच्या तुरळक सरी वगळता. पावसाळ्याचे चार महिने कोरडे गेलेले आहेत. सप्टेंबर महिन्यात खरीपाचे पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. जिरायती भागातील भात, भुईमुगांसह खरीपाची पिके व रानातील चाराही जळाल्याने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे.

संपूर्ण आदिवासी भागातील गरे व हळे पेरभात व लावभात पावसाअभावी जळून गेलेले आहेत.पावसाने मारलेली दडी, पिकांनी टाकलेल्या माना, ऊसावर झालेला हुमनीचा मारा, शेतमालाचे कोसळलेले भाव व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. बिताका प्रकल्प पूर्ण न झाल्याने आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे आढळा परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

वरुणराजाची वक्रदृष्टी व त्यात जायकवाडीला पाणी सोडण्याचे भूत मानगुटीवर असल्याने शेती व्यवसाय धोक्‍यात आला आहे. जनावरे सांभाळणे अवघड झाले आहे. मतदारसंघातील सर्व गावांची परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली असून दुष्काळाचे चित्र स्पष्ट दिसत आहे. वीजपुरवठा सुरळीत नाही, अशातच विजेचे दर वाढवून शेतकऱ्यांकडून वीज बिले सक्‍तीने वसूल केले जात आहे. वीज बिल न भरल्यास रोहित्र दुरुस्त केले जाणार नाही.असा फतवा महावितरणने काढलेला आहे. याकडे लक्ष वेधून भूजल कायद्याने विहिरीच्या पाण्यावर पाणीपट्टी लावून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्याचा शासनाचा विचार आहे, असा आरोप त्यात केला आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहिलेले आहेत. शेतीमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. व त्याचा परिणाम विदर्भ, मराठवाड्यापासून नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यात शेतकरी आत्महत्येचे लोन पोहोचले आहे. दुष्काळी परिस्थिती असतानांही 54 ते 55 पैसे आणेवारी लावून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा शासनाने प्रयत्न केला आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी गावनिहाय पीक सर्व्हेक्षण करुन शेतकऱ्यांच्या पिकांची आणेवारी 50 पैसेपेक्षा कमी लावण्यात यावी. त्याचप्रमाणे अकोले तालुक्‍यात पाऊस न झाल्याने संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा व दुष्काळ निवारण्यासाठी असणाऱ्या सर्व उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा शासनाला जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल व त्यासाठी तालुक्‍यामध्ये मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुक्‍याचे आ.पिचड यांनी दिला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)