पीक आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी करा

File photo

कॉंग्रेसची मागणी; पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती

संगमनेर – चालू वर्षी संगमनेर तालुक्‍यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी भाजप सरकारने तालुक्‍यात 50 पैशापेक्षा जास्त आणेवारी लावून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. संगमनेर तालुक्‍यातील आणेवारी तातडीने 50 पैशापेक्षा कमी करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे तालुक्‍याध्यक्ष बाबा ओहोळ व भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजितभाऊ थोरात यांनी केले आहे.

या संदर्भात कॉंग्रेसने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की या वर्षी राज्यात, जिल्ह्यात व तालुक्‍यात फारच कमी पाऊस झाला. पावसाअभावी पिके जळाली आहेत. तळेगाव व पठार भागात पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशातच भाजप सरकारने संगमनेर तालुक्‍यात 50 पैशापेक्षा जास्त आणेवारी लावून चांगला पाऊस झाला असल्याचे भासविले आहे. सर्व अलबेल आहे असे दाखविण्याचा सरकारचा प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे.

दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा सुरू केली आहे. खरे तर तातडीने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून सर्व गावांना पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. तळेगाव भागात मोठया प्रमाणात पशूधन आहे. ते वाचविण्यासाठी टॅंकरची संख्या वाढवावी. शासनाने गेल्या दोन वर्षांपासून जनावरांसाठीचे पाण्याचे टॅंकर बंद केले आहेत. जनावरांना पहिले पाणी द्या. चारा द्या.

विद्यार्थ्यांना शालेय शुल्क व इतर शैक्षणिक इतर सवलती द्याव्यात, अशी मागणी ओहोळ व थोरात यांनी केली आहे. सर्वत्र पिके जळून गेली आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. शासन मदत करीत नाही. भाजप सरकारने खूप आश्‍वासने दिली. ती पूर्ण केली नाहीत. शेतीमालाला भाव नाही. दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. बेरोजगारी वाढली आहे. तरुणांना काम नाही. शासनाचे ठोस महत्वपूर्ण निर्णय नाहीत.

जाहिरातबाजी, फसव्या घोषणांत सरकार रमले आहे. एकही रचनात्मक काम नाही. कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात कॉंग्रेसनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून सरसकट कर्जमाफी केली होती. वेळोवेळी शेतकऱ्यांना दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यांसारख्या अडचणीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. तालुक्‍यात ही खूप मोठी मदत झाली होती. या वर्षीच्या दुष्काळात शेतकरी, शेतमाल, दुग्ध व्यवसाय या बाबत बाळासाहेब थोरात यांनी सरकारला अभ्यासपूर्ण सूचना केल्या; परंतु त्याकडे शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता आता भाजप सरकारला वैतागली आहे.

सरकारने तातडीने तालुक्‍यातील आणेवारी कमी करून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. अन्यथा, झालेल्या आंदोलनास सरकार जबाबदार राहील, असा इशारा शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पा.खेमनर, ऍड.माधवराव कानवडे, विश्‍वासराव मुर्तडक, रणजितसिंह देशमुख,रामदास पा.वाघ, शंकर पा.खेमनर, शिवाजी थोरात, लक्ष्मणराव कुटे, अजय फटांगरे, भाऊसाहेब कुटे, निशाताई कोकणे, नवनाथ अरगडे, अर्चना बालोडे, अमित पंडित, रामहरी कातोरे, आनंदा वर्पे आदी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)