आरटीई प्रवेशासाठी 5 मार्च पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

संगमनेर – आर्थिक व दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यातंर्गत शाळांमध्ये राखीव असलेल्या 25 टक्‍के आरक्षित जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. या योजनेनुसार शैक्षणिक वर्ष 2019- 2020 यासाठी 5 मार्चपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून पालकांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करता येईल. यंदा 350 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी आवश्‍यक असलेल्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 22 मार्च 2019 पर्यंत इयत्ता पहिलीसाठी 6 वर्ष पूर्ण असे वय असणे आवश्‍यक आहे.

आरटीई प्रवेशासाठी मागील वर्षी 27 शाळांमध्ये 343 जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी 537 अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जांतून चार प्रवेश फेऱ्यांमध्ये 293 बालकांची लॉटरी लागली. त्यापैकी 246 बालकांनी प्रवेश घेतला होता.
या वर्षासाठीची प्रवेश फेरी 5 मार्चपासून सुरू होत आहे. पालकांनी सोशल मीडियावर येणाऱ्या चुकीच्या माहितीवर, पोस्टवर विश्वास न ठेवता अधिकृत वेबसाइटवर 5 मार्च ते 22 मार्च या कालावधीत विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे

प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी पत्त्याचा पुरावा व जन्म दाखला आवश्‍यक आहे. या दोन कागदपत्रांसोबत एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र (वडील किंवा विद्यार्थी यांचे) आवश्‍यक आहे. तर खुल्या गटातील विद्यार्थ्यांना पत्त्याचा पुरावा व जन्मतारीख दाखला यासोबतच वर्ष 2017-18 चा एक लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला आवश्‍यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना पत्त्याचा पुरावा व जन्मतारीख दाखला यासोबतच जिल्हा शल्य चिकित्सकांचा दाखला आवश्‍यक आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)