प्रधानमंत्री किसान योजनेंसाठी शेतकऱ्यांची धावपळ

बॅंक खाते, आधार क्रमांक देण्यासाठी तलाठी कार्यालयात गर्दी

संगमनेर – केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्‍टरपर्यंत शेतजमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी संगमनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून, त्यामध्ये बॅंक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक ग्रामस्तरीय समितीकडे सादर करण्यासाठी गावा-गावात शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक प्रत्येक शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार रुपये आर्थिक साहाय्य तीन टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत तालुक्‍यातील पाच एकरपर्यंत शेती असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे.

गावस्तरावर संबंधित तलाठ्यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समितीमध्ये कृषी सहायक व ग्रामसेवकांचा समावेश आहे. ग्रामस्तरीय समितीकडून तयार करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या याद्यांची तहसील स्तरावर तालुकास्तरीय समित्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान राज्य आणि केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत.

याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेत ग्रामस्तरीय समितीकडून शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक घेण्यात येत आहेत. त्यानुषंगाने ग्रामस्तरीय समितीमधील तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे बॅंक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक सादर करण्यासाठी गावा-गावांत शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणे तसेच शेतकऱ्यांचे बॅंक खाते, आधार व मोबाइल क्रमांक संकलनाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी शनिवार व रविवारी सुटी असूनही तहसील कार्यालय, गावा-गावांतील तलाठी, महसूल मंडळ अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी सहायकांची कार्यालये सुरू होती. गावपातळीवर तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांकडून शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक, आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक घेण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)