जामखेड मनसेची तहसीलदारांकडे मागणी
जामखेड – राज्य शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांना विविध योजना जाहीर केलेल्या असताना त्याची प्रभावीपणे अमलबजावणी होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देऊन तालुक्यातील दुष्काळी उपाय योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी केली.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुका दुष्काळग्रस्त असून शासनाने विविध उपाय योजना जाहीर केलेल्या आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
शासनाने ज्या उपाययोजनांची घोषणा केली आहे, त्या सर्व योजना तत्काळ प्रभावीपणे अंमलात आणून उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी करत शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, सहकारी बॅंकेच्या कर्जाचे पुनर्गठन करावे, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती द्यावी, कृषी पंपाच्या वीज बिलात 33.50 सूट देण्यात यावी, शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी मिळावी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता करावी, आवश्यक तेथे पिण्याचे टॅंकर चालू करावे, टंचाई जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित करु नये, जनावरांसाठी तत्काळ चारा छावण्या सुरु कराव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष वैभव जामकावळे, तालुकाध्यक्ष प्रदीप टाफरे, उपाध्यक्ष सनी सदाफुले, कुसडगावचे माजी सरपंच दादासाहेब सरनोबत, शहराध्यक्ष बालाजी भोसले, गणेश पवार, धीरज निकाळजे, सोनू कदम, उमेश पवार, उमेश कांबळे, आमिर शेख, संतोष भांड, अंगद डूचे, दीपक नेटके, आकाश साठे,वैजिनाथ भुळे आदिंच्या सह्या आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा