पाॅलिहाऊसधारकांच्या कर्जमुक्तीसाठी राज्यव्यापी लढा

20 फेब्रुवारीला नगरमध्ये होणार राज्यव्यापी मेळावा

अकोले – पॉलिहाऊस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, या मागणीसाठी राज्यव्यापी लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यात झालेल्या शेडनेट पॉलिहाऊस धारकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचाच एक भाग म्हणून येत्या 20 फेब्रुवारी रोजी नगर येथे पॉलिहाऊस व शेडनेटधारक प्रश्‍नी राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पॉलिहाऊस शेडनेटधारक शेतकरी अभूतपूर्व संकटात सापडले आहेत. तरुण शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत पॉलिहाऊस व शेडनेट उभारण्यासाठी भरीस पाडून कर्जबाजारी केले गेले. मात्र त्यानंतर अनुदान न देता त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याने राज्यभरातील हजारो तरुण शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत. ऐतिहासिक शेतकरी संप व किसान सभेच्या लॉंगमार्च नंतरही या शेतकऱ्यांची कर्जमुक्‍ती झालेली नाही.

अशा शेतकऱ्यांवर लाखो रुपयांचे कर्ज असल्याने एकरकमी कर्ज परतफेड योजनेचाही लाभ हे शेतकरी घेऊ शकलेले नाहीत. अशा पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करण्याची मागणी करण्यात येत आहे. अकोले येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीसाठी नगर, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, नाशिकसह राज्यभरातून सर्वच प्रमुख जिल्ह्यांमधून प्रतिनिधी हजर होते. उपस्थित प्रतिनिधींनी आंदोलन व संघटनेच्या समन्वयासाठी राज्य समन्वय समिती गठीत केली.

किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्यासह महेश शेटे, बाळासाहेब दरंदले, सुजाता थिटे, किरण अरगडे, अरविंद कापसे, बाळासाहेब गडाख, शिवाजी नाईक, विजय नाईक, मनोज आहेर, संजय तळेकर, प्रल्हाद बोरसे, विशाल कदम, अण्णासाहेब शिंगवन, शिवाजी तळेकर, गणेश वाघ, दिलीप डेंगळे, राजेंद्र लंगोटे आदींनी यावेळी आपले विचार मांडले. दि.20 फेब्रुवारी रोजी नगर येथे होणाऱ्या राज्यव्यापी मेळाव्यास पॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)