गोबरगॅस टाकीत गुदमरून पिता-पुत्रांचा मृत्यू

श्रीगोंदा तालुक्‍यातील हिंगणी दुमाला येथील घटना

श्रीगोंदा – तालुक्‍यातील हिंगणी दुमाला येथील वाखारेवस्तीवर गोबर गॅसची टाकी साफ करण्यासाठी उतरलेला मुलगा बराच वेळ बाहेर न आल्याने पहायला गेलेल्या वडिलांचा मुलासह टाकीत गुदमरून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्‍यातील हिंगणी दुमाला येथील वाखारेवाडीवर शुक्रवारी (दि.11) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. विष्णू पोपट वाखारे (वय 50) व अजित विष्णू वाखारे (28) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंगणी दुमाला येथे वाखारेवाडीवर राहणाऱ्या वाखारे कुटुंबातील अजित हा शुक्रवारी दुपारी गोबरगॅसची टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरला. मात्र बराच वेळ झाला, तरी मुलगा बाहेर न आल्याने त्याचे वडील विष्णू वाखारे हे देखील त्या टाकीत उतरले. मात्र टाकीत तयार झालेला गॅस आणि टाकीची खोली जास्त असल्याने श्वास न घेता आल्याने या दोघांचा गुदमरून मृत्यू झाला.

बऱ्याच वेळानंतर घरातील व्यक्तींनी या दोघा बाप-लेकांचा शोध घेतला. मात्र ते दिसले नाहीत. यावेळी गोबरगॅस टाकीच्या बाजूला चप्पल व मोबाइल दिसल्याने शोध घेतला असता अजित व त्याचे वडील विष्णू हे दोघे आढळून आले. कुटुंबातील व्यक्तींनी दोघांनाही शिरूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी या दोघांनाही मृत घोषित केले.
दरम्यान, विष्णू वाखारे यांना अजित हा एकुलता एक मुलगा होता. अजित याला एक मुलगा, एक मुलगी आहे. बाप-लेकांच्या या दुर्दैवी मृत्यूने हिंगणी गावावर शोककळा पसरली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)