राष्ट्रवादीचे 18 नगरसेवक बडतर्फ

महापौर निवडणूक : जिल्हाध्यक्ष विधातेंची पदावरून हकालपट्टी

नगर : नगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारून भाजपला मतदान करणाऱ्या सर्व नगरसेवकांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने बडतर्फीची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे नगरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीने कारवाई केलेल्या बडतर्फ नगरसेवकांचे नेतृत्व करणारे अरूणकाका जगताप आणि संग्राम जगताप ही आमदार पिता-पुत्रांची जोडी आगामी निवडणुकीत भाजपच्या आश्रयाला जाण्याची चिन्हे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या महिन्यात 28 डिसेंबर रोजी नगर पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांना मतदान केले होते. त्यामुळे हाती संख्याबळ नसतानाही भाजपने पालिकेची सत्ता खेचून राजकीय चमत्कार घडवून आणला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जागावाटपाची चर्चा सुरू असताना नगरमध्ये राष्ट्रवादीने भाजपला साथ दिल्याने राष्ट्रवादीबद्दल संशय वाढला होता.

पक्षाच्या आदेशाला हरताळ फासण्याच्या नगरसेवकांच्या कृतीची पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली होती. पवार यांनी नगरमध्ये जाऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच यासंदर्भात कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरसेवकांना “कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती.

महापौर निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याचा आदेश असताना तो डावलण्यात आला. याबद्दल आपले म्हणणे सात दिवसात मांडावे, अशी सूचना राष्ट्रवादीने नगरसेवकांना केली होती. मात्र, नोटीस बजावूनही कोणताही खुलासा न करण्यात आल्याने जयंत पाटील यांनी नगरसेवकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादीने नगरसेवकांसह नगरच्या जिल्हाध्यक्षांवरही कारवाई केली आहे. जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना अशा प्रकारच्या पक्षविरोधी कारवाई होत असताना पक्षश्रेष्ठींना कोणतीही कल्पना दिली नाही. तसेच घडलेल्या घटनेबाबत कोणताही खुलासा न केल्याने पदावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)