नागवडेंनी सहकारी कारखान्यातून खासगी कारखान्याचे हित साधले

बबनराव पाचपुते : कारखान्याच्या आठ कोटींच्या साहित्याला पाय फुटल्याचा केला आरोप

-दरेकर व नाहाटांचेही नागवडेंवर गंभीर आरोप

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रीगोंदा – नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सहकारी कारखान्याचा वापर स्वतःच्या खासगी कारखान्याचे हित साधण्यासाठी केल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

पत्रकारांशी बोलताना पाचपुते म्हणाले, नागवडे साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमच्या विरोधात प्रचार करताना राजेंद्र नागवडे खासगी विरुद्ध सहकार, असा आरोप करीत होते. आता नागवडे कारखाना सहकारी असताना त्याद्वारे ते परभणीतील त्यांच्या खासगी कारखान्याचे हितसंबंध जोपासत आहेत. या सर्व बाबींचे आमच्याकडे पुरावे आहेत. या प्रकरणाच्या चौकशीची आपली मागणी आहे. नागवडे कारखान्याचे सुमारे 8 कोटी रुपयांच्या साहित्याला कसे काय पाय फुटले, हे आपण समोर आणणार आहोत. नागवडेंच्या ज्ञानदीप शाळेच्या बांधकामाची परवानगी नाही.

परवानगी नसलेल्या शाळेला स्त्यासाठी पालिकेने निधी कसा दिला, असा सवाल करत नागवडे यांच्या या कृतीतून स्वार्थीपणा दिसून येतो, अशी टीका केली. यावेळी उपस्थित असलेले बाळासाहेब नाहाटा म्हणाले, परभणीच्या साखर कारखान्यात किती साहित्य येथून गेले, याची यादी दोन दिवसांनी विस्तृतपणे देणार आहे. नागवडेंच्या कामकाज पद्धतीमुळे कामगार सुद्धा वैतागले आहेत. नागवडे यांना सत्ता समाजसेवेसाठी नाही, तर स्वतःची संपत्ती वाढविण्यासाठी पाहिजे प्रा. दरेकर म्हणाले, शनिवारी नागवडे कारखान्यातून 240 सिमेंट गोण्या छत्रपती महाविद्यालयाला लागत असल्याचे कारण सांगून श्रीगोंद्यात आणल्या गेल्या.

या गोण्या कोठे चाललेल्या हे पाहण्यासाठी आम्ही गेलो असता संबंधित वाहन छत्रपती महाविद्यालयात न जाता आनंदकर मळ्यात चालले होते. याची आपण चित्रफीत काढली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर संबंधित वाहन चालकाला या 240 गोण्या छत्रपती महाविद्यालयात नेण्यास सांगितल्या. त्यानंतर कागदपत्री रेकॉर्ड क्‍लीअर करून हा प्रकार दडपण्यात आला. यांना नगरपरिषदेची सत्ता मिळाली, तर त्याचा उपयोग खासगी हितसंबंधासाठी होईल. यावेळी पोपटराव खेतमाळीस, दीपक शिंदे, संतोष इथापे, भरत नाहाटा, नंदकुमार कोकाटे आदी उपस्थित होते.

पराभव दिसू लागल्याने आरोप- नागवडे
या आरोपासंदर्भात विचारले असता, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे दै. प्रभातशी बोलताना म्हणाले, श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. या निवडणुकीत विरोधकांना आपला पराभव दिसू लागला आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे बिनबुडाचे आरोप आपणावर केले जात आहेत. या आरोपांना जनताच निवडणुकीतून उत्तर देईल.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)