अतिक्रमण कारवाईची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करा

सकल मराठा समाजाच्यावतीने मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांना निवेदन

कर्जत – कर्जत येथील पीर दावल मलिक देवस्थान ट्रस्ट येथील व्यवसायिकांनी बांधलेली बांधकामे पाडण्यात आली. या कारवाईची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी व संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सकल मराठा समाजाचे कर्जत तालुका समन्वयक डॉ. धनराज राणे यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांना पोस्टाद्वारे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवेदनात म्हटले आहे की, कर्जत येथील हजरत पीर दावल मलिक देवस्थान ट्रस्टची कर्जत शहराला लागुनच गट नं. 757/1 व इतर या जमीनी आहेत. या जमीनीचे उत्पन्नातून देवस्थानच्या देखभालीची व्यवस्था करावी, असा मूळ उद्देश होता. मात्र पाण्याअभावी तेथे शेतजमीनीतून उत्पन्न घेणे शक्‍य होत नव्हते.

त्यामुळे देवस्थानचे ट्रस्टी जहांगीर इब्राहीम शेख यांनी काही गरजू लोकांना करारनामे करुन, रस्त्याची पूर्ण हद्द सोडून लगतची जागा व्यवसाय करणेसाठी दिली होती. त्यावर बांधकाम करून अनेकांनी 20 वर्षापूर्वी तेथे व्यवसाय सुरु केले. व्यावसायिकांवर अतिक्रमण केल्याचा आरोप करीत ही बांधकामे पाडण्यात आली. ही कारवाई बेकायदेशीररीत्या करण्यात आली.

यासंदर्भात तौसीफ शेख यांनी वेळोवेळी निवेदने देऊन आंदोलने करून योग्य रीतीने पाठपुरावा केला. न्याय मिळत नसल्याने त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. तरीही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे शेख यांचा बळी गेला. आत्मदहन केले, त्या दिवशी शेख यांच्याबरोबर कोण होते? त्यांचा त्या दिवशी कोणा-कोणाशी फोनवरून संपर्क झाला?

घटनेचे प्रत्यक्षदर्शी कोण कोण होते? केलेली बांधकामे ही अतिक्रमणे होती का? बांधकामे करणाऱ्या व्यवसायिकांना नोटिसा दिल्या का? अतिक्रमणे काढण्यापूर्वी त्यांच्या चीजवस्तू काढण्यासाठी त्यांना वेळ का दिला नाही? असे अनेक प्रश्न निवेदनातून उपस्थित केले आहेत. या अतिक्रमण कारवाईची निवृत्त न्यायाधीशांकडून सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)