ग्रामीण भागात खाकी वर्दीची वाढतेय क्रेझ 

उच्चशिक्षित तरुण तरुणींना आकर्षण


-गणेश घाडगे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेवासा – ग्रामीण भागात खाकी वर्दीची क्रेझ वाढत असल्याचे दिसून येत आहे. लवकरच पोलीस दलात जंबो नोकर भरती केली जाईल अशी घोषणा नुकतीच शासनाने केली आहे. याच पार्श्‍वभूमीवर उच्च शिक्षण घेतलेले अनेक तरुण-तरुणी पोलिसांत भरती होण्यासाठी दररोज सकाळ-संध्याकाळ सराव करीत असल्याचे चित्र नेवासे तालुक्‍यात सर्रास दिसून येत आहे.

पोलीस दलात लवकरच शासनाने 72 हजार पदे भरण्याचे जाहीर केले असल्याने, ग्रामीण भागात तरुणांना पोलीस दलात भरती होण्याचे विशेष आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. इतर नोकऱ्यात वाढती बेरोजगारी व जीवघेणी स्पर्धा निर्माण झाल्याने या पोलीस दलात भरतीसाठी या तरुणांचा अधिक कल दिसून येत आहे. पोलीस शिपाई राज्य राखीव दल, तुरुंग रक्षक लोहमार्ग या भरतीसाठी शासनाने 5 किलोमीटर ऐवजी 1 हजार 600 मीटर धावण्याचे अध्यादेश काढले असून, यासाठी 4 मिनिटे 50 सेंकदाचा वेळ होता. यामध्ये नवीन सुधारणा करीत आता 5 मिनिटे 10 सेंकदात हे अंतर पूर्ण करणाऱ्या उमेदवारास 20 गुण मिळणार आहेत.

या भरतीचा निकाल धावणाऱ्यांवर अवलंबून आहे. आतापर्यंत नेवासे तालुक्‍यातून तरुणांनी या भरतीकडे विशेष लक्ष दिले नसल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र सैन्यदलात भरती होणाऱ्या तरुणांची संख्या लक्षणीय आहे. प्रती वर्षाच्या तुलनेत कमी पदसंख्या होत असल्याने पोलीस होण्यासाठी मोठी स्पर्धा होत आहे. या नोकरीसाठी एमए, डी.एड, बी.एस्सी, इंजिनीअरिंग, फार्मसी झालेले उच्चशिक्षित तरुण या वर्ग चारच्या पदासाठी इच्छुकांची संख्या वाढत असलेली दिसून येत आहे.

या भरतीसाठी 1 हजार 600 मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, 100 मीटर धावणे, पूलअप्स आदी 100 गुणाची शारीरिक परीक्षा व 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार असून, तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये पहाटे चारपासून शेकडो तरुण सराव करताना दिसत आहेत. गावात स्वयंरोजगार उपलब्ध होत नसल्याने, कामाच्या शोधात ग्रामीण भागातील शिक्षण पूर्ण केलेले तरुण मुंबई-पुण्याकडे जातात. या पोलीस भरतीसाठी महिलांना आतापर्यंतच्या तुलनेत अधिक जागा राखीव असल्याने तालुक्‍यातील तरुणींनीदेखील पोलीस होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

पदांची संख्या कमी

दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या काळापासून प्रतिवर्षी 11 हजार पदांची भरती केली जाणार होती. मात्र त्या तुलनेत दरवर्षी कमी जागेसाठी भरती होत असल्याची, खंतही तरुणांनी व्यक्त केली पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक होत असल्याने तरुणाचा ओढा या नोकरीसाठी आहे. पोलीस भरती पारदर्शक होत असल्यामुळे ग्रामीण भागातील तरुण-तरुणी याकडे वळले जात असल्याचे अनेकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)