शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय ऊस बिलातून कर्जवसुली करणार नाही

File Photo

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची माहिती

श्रीगोंदा – शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्यास जिल्हा सहकारी बॅंकेने नकार दिला आहे. जिल्हा सहकारी बॅंकेने ऊस बिलातून कर्ज वसूली करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र नागवडे कारखाना शेतकऱ्यांची संमती असल्याशिवाय ऊस बिलातून जिल्हा सहकारी बॅंकेची वा अन्य बॅंकांची कर्ज वसूली करणार नसल्याची माहिती नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासंदर्भात माहिती देताना नागवडे म्हणाले, राज्यातील व जिल्ह्यातील सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करुन, जिल्हा सहकारी बॅंक व राष्ट्रीयकृत बॅंकांनी शेती व शेतीसंबंधी कर्जाची वसूली तूर्तास स्थगित करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती व आजही आहे. याबाबतीत आम्ही शेतकऱ्यांशी सहमत होतो. जिल्हा सहकारी बॅंकेने शेती व शेतीसंलग्न कर्जाची वसूली स्थगीत करण्याची भूमिका संचालक म्हणून बॅंकेच्या बैठकीत घेतल्याचे सांगितले. मात्र बॅंक प्रशासन कर्ज वसूली स्थगिती देण्यास वा कर्ज वसूली थांबविण्याबाबत सकारात्मक नाही.

बॅंकेच्या ही काही अडचणी असल्याने बॅंकेने ऊस बिलातून कर्ज वसूली सुरु ठेवण्याची भूमिका घेतल्याचे सांगून, ते म्हणाले, जिल्हा बॅंकेची ऊस बिलातून कर्ज वसूली सुरु राहणार असली तरी, शेतकऱ्यांची संमती असल्याशिवाय नागवडे कारखाना ऊस बिलातून जिल्हा बॅंकेची वा अन्य कोणत्याही बॅंकेची कर्ज वसूली परस्पर करणार नाही. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सक्तीने शेतकऱ्यांकडून कर्जवसूली न करण्याची भूमिका आपण यापूर्वीच घेतली होती. जिल्हा सहकारी बॅंक व राज्य सरकारच्या स्तरावरही या मागणीचा आपण पाठपुरावा केलेला असल्याचे सांगितले.

राज्यातील काही जिल्हा सहकारी बॅंकांनी शेतकऱ्यांच्या शेती व शेतीसंलग्न कर्जाच्या वसूलीला स्थगिती दिलेली आहे. नगर जिल्हा बॅंकेनेही तसाच निर्णय करण्याची मागणी आपण बैठकीत केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र बॅंकेच्या स्तरावर काही अडचणी असल्याने शेती कर्ज वसूलीला स्थगिती देण्यास जिल्हा बॅंकेने असमर्थता दर्शविली असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागवडे कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनी ऊस बिलातून कर्ज वसूली न करण्याची लेखी मागणी केल्यास नागवडे कारखाना शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून परस्पर जिल्हा बॅंकेची वा अन्य कोणत्याही बॅंकेची कर्ज वसूली करणार नाही. ज्या शेतकऱ्यांना ऊस बिलातून कपात करण्यास हरकत असेल, अशा ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी कारखान्याचे अकाउंट विभागात तातडीने लेखी अर्ज देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)