वंचित बहुजन आघाडीचा बैठा सत्याग्रहाचा इशारा

पाथर्डीतील अतिक्रमण काढताना प्रशासनाने भेदभाव केल्याचा आरोप

पाथर्डी – शहरातील अतिक्रमण काढताना प्रशासनाने भेदभाव केला, गोरगरिबांची अतिक्रमणे काढून प्रशासनाने राजकीय पुढाऱ्यांची व धनदांडग्यांची अतिक्रमणे काढली नाहीत, पालिकेच्या मालकीच्या भूखंडावरील धनदांडग्यांची व राजकीय पुढाऱ्यांची अतिक्रमणे तातडीने काढा अन्यथा येत्या 2 जानेवारीला पालिका कार्यालयात बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या संदर्भात तहसीलदार नामदेव पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरात समान न्याय तत्वावर अतिक्रमण विरोधी मोहीम राबवा अशी मागणी आम्ही केली होती, मात्र गेल्या आठ दिवसात जी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली त्यामधे भेदभाव करण्यात आला आहे. या मोहिमेत जे गरीब व्यावसायिक होते त्यांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढली. मात्र ही मोहीम राबवताना पालिकेने शंका घेण्यास वाव ठेवला आहे.

काही धनदांडग्यांनी व राजकीय वरदहस्त असलेल्या नेत्यांनी पालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा बळकावल्या असून पालिकेने मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यांच्या संदर्भात पालिका वेळकाढूपणाचे धोरण अवलंबीत आहे. सर्वसामान्य लोकांना व धनदांडग्यांना वेगवेगळा न्याय पालिकेने दिला आहे. पालिकेच्या या भूमिकेमुळे गरीब व्यायसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

पालिकेने तातडीने धनदांडग्यांची अतिक्रमणे न काढल्यास सध्या ज्या गरीब व्यायसायिकांनी आपली अतिक्रमणे काढली आहेत त्यांना पुन्हा एकदा वाजत गाजत त्याच जागेवर अतिक्रमण करण्यास आम्ही भाग पाडू. येत्या 2 जानेवारीपर्यंत ही अतिक्रमणे न काढल्यास पालिका कार्यालयात विस्थापित झालेल्या अतिक्रमणधारकांसह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला असून निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक प्रा. किसन चव्हाण, तुकाराम पवार, अरविंद सोनटक्के, दीपक वराट, रवींद्र म्हस्के आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)