छेडछाड करणाऱ्यांची अर्धनग्न करून काढली धिंड

पाथर्डी शहरातील प्रकार ः मुलींसह नागरिकांनीही दिला टारगटांना चोप

पाथर्डी – पाथर्डी शहरात मुलींची छेडछाड करणाऱ्या दोघा सडकसख्याहरींना पालकांनी व नागरिकांनी चांगला चोप दिला. तसेच त्यांना अर्धनग्न करून त्यांची शहरातून धिंड काढली. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सडक सख्याहरींना अद्दल घडवण्यासाठी पालकांनी व नागरिकांनी हाती घेतलेल्या धडक मोहिमेची शहरात जोरदार चर्चा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील माणिकदौंडी परिसरात एका खासगी शिकवणी आहे. नगर रस्त्यावरील माणिकदौंडी चौकाकडून काही मुली सायंकाळी शिकवणीकडे जात होत्या. बीएसएनएल कार्यालयाच्या समोर पोलीस लाईनकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ दोन सडक सख्याहरींनी मुलींची छेड काढली. मात्र त्यातील एका मुलीने रणरागिणीचा अवतारधारण करत सडकसख्याहरींचा चांगलाच समाचार घेतला. एवढ्यावरच न थांबता पुढे जाऊन काही अंतरावर उभ्या असलेल्या नागरिकांना घडलेला प्रकार सांगितला. तसेच पालकांना घटनेची माहिती दिली.

परस्थिती बिघडल्याचा अंदाज आल्यानंतर या दोघा सडकसख्याहरींनी तिथून पळ काढला. मात्र नागरिकांनी त्यांचा शहरात शोध घेतला. तोपर्यंत पालकही घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच काही नागरिकांनी या दोघा सडकसख्याहरींना माणिकदौंडी चौकात आणले. यावेळी उपस्थितांनी त्यांना चांगलाच चोप दिला. पोलिसांत जाऊन काहीच होणार नाही, असे काहींनी सांगितल्यानंतर त्यांना अद्दल घडविण्यासाठी त्यांना अर्धनग्न करून त्यांची रस्त्याने धिंड काढण्यात आली. या प्रकारामुळे टारगट मुलांनी चांगलाच धसका घेतला आहे. या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू होती.

शहरातील शाळा, महाविद्यालये व खासगी शिकवणीच्या परिसरात मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुलींची वर्दळ असणाऱ्या परिसरात अशा टारगट मुलांच्या टोळक्‍यांचे अड्डे तयार झाले आहेत. भरधाव वेगाने गाड्या चालवणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, अश्‍लिल शेरेबाजी करणे, शिट्ट्या वाजवणे, चित्रविचित्र हावभाव करणे, असे प्रकार त्यांच्याकडून करण्यात येतात.

रस्त्यावरच करतात वाढदिवस साजरे

आता तर उपनगरांच्या मुख्य रस्त्यांवर मधोमध गाड्या लावून, अशा उनाड मुलांचे वाढदिवस साजरे केले जातात. पालकांकडून विरोध केल्यास दमदाटी व मारहाणीचे प्रकार घडले आहेत. पोलिसांकडून अशा बाबीची गंभीर दखल घेतली जात नसल्याने चारचौघांत इज्जत जायला नको, म्हणून पालकांकडून पोलिसांकडे जाणे टाळले जात आहे. पोलिसांकडून छेडछाडीविरोधात ठोस कारवाई होत नसल्याने पालिकांनी उघडलेल्या धडक मोहिमेचा धसका टारगटांनी घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)