बिबट्याला ठेचून मारल्याप्रकरणी होणार गुन्हे दाखल- भास्कर शिंदे

File photo

नगर – तालुक्‍यातील कामरगाव येथील शेतमजूर महिलेसह दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याने, हल्ला करणाऱ्या जखमी बिबट्याला ग्रामस्थांनी घेराव घालून लाठ्या-काठ्यांनी ठेचून मारल्याप्रकरणी चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ज्यांनी बिबट्याला मारले त्यांच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी भास्कर शिंदे यांनी दिली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच घबराट निर्माण झाली आहे.

कामरगाव येथे गुरूवारी दि. 20 डिसेंबरला कामरगाव येथील दोन महिला शेतात जात असताना शालिनी ठोकळ यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यासोबत असलेल्या रोहिणी करम यांनी दगड मारल्याने बिबट्याने पळ काढला. जखमी शालिनी ठोकळ यांना उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले, त्या सध्या उपचार घेत आहेत. शालिनी ठोकळ, रोहिणी करम या दोन महिलांवर हल्ला केल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी ग्रामस्थांनी शेताला घेराव घातला होता, तो घेराव घातलेल्यांपैकी माळी नावाच्या तरूणावर बिबट्याने झडप घातली. या तरूणाने

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र निधड्या छातीने बिबट्याचा हल्ला हाणून पाडला. या तरूणाने बिबट्याला दाबून धरले होते. त्यापूर्वी बिबट्याने या तरूणास चावा घेतला होता, त्याला काही ग्रामस्थांनी साथ दिल्यामुळे माळी यांची सुटका झाली. माळी यांनाही उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परिसरातील ग्रामस्थ जमा झाल्यानंतर बिबट्या गुरगुरत होता, उसळी मारत होता. याचदरम्यान काही ग्रामस्थांनी बनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तोपर्यंत ग्रामस्थांनी बिबट्याला काठ्यांनी बदडून काढले. यातच बिबट्या निपचीत पडला होता.

दरम्यान वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भास्कर शिंदे व वनपाल अनिल गावडे हे कामरगावच्या शिवारात आले. मृत बिबट्याला वन अधिकाऱ्यांनी पंचनामा करून ताब्यात घेतले. आज सकाळी नगर-औरंगाबाद रोडवरील बनविभागाच्या परिसरात त्याची तपासणी करून अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान बिबट्या पूर्वीच जखमी होता का, ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यात तो मृत पावला याची चौकशी अहवाल आल्यानंतर
ग्रामस्थांनी तो मारला असल्यास कलम 9 नुसार शिकार करणे, कलम 49 शासकीय वनसंपत्ती नष्ट करणे, कलम 50 व 51 नुसार वन्यप्राणी पकडणे, बेकायदा मारणे यानुसार आरोपींवर गुन्हे दाखल होणार असून असा गुन्हा अजामीनपात्र आहे. या प्रकरणात जामीन होत नाही, अशी माहिती नगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी भास्कर शिंदे व फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांनी दिली.

याबाबत गुन्हे दाखल होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर नागरिकांना कोणत्याही भागात बिबट्या अगर कोणतेही वन्य प्राणी दिसल्यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती द्यावी, त्यांना मारण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भास्कर शिंदे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)