पिंपळगाव खांड धरणातून आवर्तन सुटणार

संगमनेर – दुष्काळी परिस्थितीत पोलिस बंदोबस्तात सोमवारी ( दि.17 डिसेंबर) पिंपळगाव खांड धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून या संदर्भात झालेल्या बैठकीत संगमनेर, अकोले व पारनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांत खडाजंगी झाली. अकोलेच्या काही शेतकऱ्यांनी शेवटपर्यत पाणी सोडण्यास विरोध दर्शविला तर पारनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी हे पाणी शिंदोडीपर्यत (संगमनेर) सोडण्याची मागणी केली. त्यातुन भरल्या जाणाऱ्या बंधाऱ्यातुन पारनेर तालुक्‍याला पाणी मिळू शकेल असे येथील शेतकऱ्यांनी सांगितल्याने वाद वाढला होता.

संगमनेरमध्ये झालेल्या या बैठकीसाठी आ. वैभव पिचड, जिल्हा परिषदेचे कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे, बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, जिल्हा परिषद सदस्य मीरा शेटे, बाजार समिती सभापती शंकर खेमनर, मिनानाथ पांडे, बाबा ओहोळ, संजय भोर, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, संगमनेरचे तहसीलदार साहेबराव सोनवणे, अकोलेचे तहसिलदार मुकेश कांबळे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता किरण देशमुख, उपअभियंता आर. बी. आरोटे, राष्ट्रवादीचे बाळासाहेब ढोले आदींसह पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या अकोले, संगमनेर, पारनेरमधील शेतकरी, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धरणातून सोडले जाणारे पाणी कमी दाबाने असल्याने ते शेवटपर्यत पोहोचणार नाही. त्यामुळे ते लाभक्षेत्रातील शेवटच्या आभाळवाडीपर्यत जाईल, तसेच गेल्यावेळी आमच्या अधिकाऱ्याला साकुरच्या शेतकऱ्यांनी चुकीची वागणुक दिल्याचे देशमुख यांनी सांगितल्याने बैठकीत गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर पिचड यांनी मध्यस्थी करत हा वाद थांबविला.

धरणातुन येत्या सोमवारी सोडल्या जाणाऱ्या पाण्यातुन संगमनेरमधील आठ व अकोलेतील सात बंधारे भरुन घेतले जातील. साडेपाचशे एमसीएफटी पाणी साठा धरणात शिल्लक असून त्यापैकी साडेतीनशे एमसीएफटी पाणी सोडले जाईल. उर्वरित पाणी दुष्काळी परिस्थितीचा अंदाज घेत जुलैपर्यत शिल्लक ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

धरणातील पाण्याचे आवर्तन मुळा नदीपात्रापर्यत सोडले जावे अशी पारनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची मागणी होती.
संगमनेरमधील शेवटच्या शिंदोडी गावापर्यत पाणी आल्यास नदी पात्राच्या लगत असलेल्या पाणी पुरवठा योजना पारनेरमधील मांडवे खुर्द, देसवडे, टेकडवाडी, काळेवाडी व पोखरी, संगमनेरमधील हिरेवाडी, चिंचेवाडी, शेंडेवाडी, हिवरगाव पठार, जांबुत, मांडवे बुद्रुक, नांदुर खंदळमाळवाडी, साकुर, बिरेवाडी, कौठे मलकापुर आदी गावांना मिळू शकेल अशी भुमिका शेतकऱ्यांनी बैठकीत मांडली. दुष्काळी स्थितीमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईत हे पाणी शेवटपर्यत कसे जाईल यासंदर्भात अधिकाऱ्यांनी नियोजन करण्याच्या सुचना आमदार पिचड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)