अतिक्रमण करणारा पालिका कर्मचारी निलंबित

पाथर्डी – नगरपालिकेच्या लिपिकाने पालिका हद्दीत शासकीय जागेत अतिक्रमण केले होते. ते काढण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी लिपिक शौकत इस्माईल सय्यद याला मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. या घटनेमुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, पाथर्डी नगरपालिकेतील कर्मचारी शौकत इस्माईल सय्यद हा यापूर्वी अतिक्रमण विभागाचा प्रमुख होता. शहरातील अतिक्रमणाच्या वादग्रस्त मुद्यावरूनच त्याच्याकडून या विभागाचे काम काढून घेऊन त्याच्यावर इतर काम सोपवले. नेहमीच वादग्रस्त राहिलेल्या शौकत सय्यद याने शेवगाव रोडलगत अर्जुनबाबानगर येथे न्यायप्रविष्ट असलेल्या शासकीय जागेत अतिक्रमण केले. ही बाब परिसरातील नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून संबंधित अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती.

-Ads-

तक्रारीची दखल घेत मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी अतिक्रमण विरोधी पथकाला सदर अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. गुरुवारी (दि.6) पथकाचे प्रमुख सोमनाथ गर्जे, पालिकेचे अभियंता संजय गिरमे, कार्यालयीन अधीक्षक अयूब सय्यद, किशोर पारखे, अशोक डोमकावळे, अंबादास साठे आदी अतिक्रमण काढण्यास गेले असता, शौकत सय्यद तेथे आला. त्याने ही जागा माझ्या पत्नीच्या नावे असून, हे अतिक्रमण तुम्ही काढल्यास पोलिसात तक्रार देईल, अशी धमकी दिली. पालिका कर्मचारी असूनही अतिक्रमणविरोधी पथकाबरोब अर्वाच्च भाषेत हुज्जत घातली. या घटनेनंतर अतिक्रमण विरोधी पथकाने संबंधित घटनेचा सविस्तर अहवाल मुख्याधिकारी कोळेकर यांना सादर केला.

आज (दि.7) सय्यद यांच्या नातेवाइकांनी मुख्याधिकारी कोळेकर यांना पालिका कार्यालयात येऊन धारेवर धरून जाब विचारला. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून कोळेकर यांनी पालिका कर्मचारी शौकत सय्यद याच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख असतानाही सय्यद याची पालिकेतील कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. या काळात रातोरात पालिका हद्दीत अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

बेकायदा वृक्षतोडीची चौकशी प्रलंबित

निलंबित पालिका कर्मचारी शौकत सय्यद याने खेर्डे शिवारात शासकीय जमीन बळकावून वन खात्याच्या हद्दीतील बेकायदा वृक्षतोड केल्याचा आरोप खेर्डे ग्रामस्थांनी केलेला आहे. याबाबत वनविभाग व महसूल विभागाकडे चौकशी प्रलंबित आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)