सुनील गाडगे : शिक्षक भारतीची शासनाकडे मागणी
नगर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचे गुणदान लागू करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे सुनील गाडगे यांनी शालेय शिक्षण मंत्री, प्रधान सचिव व शिक्षण मंडळाचे सचिव यांच्याकडे एका लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत मार्च 2019 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान वगळता बाकी विषयांसाठी देण्यात येणारे अंतर्गत मुल्यमापनाचे गुणदान बंद करण्यात आले असून, हा निर्णय अतियश अन्यायकारक आहे. या निर्णयामुळे मार्च 2019 मध्ये आयोजित केलेली दहावीची परीक्षा मानसिक दडपणाखाली होणार असल्याचे सुनील गाडगे यांनी म्हटले आहे.
शिक्षक भारतीची तातडीची सहविचार सभा नगरच्या शिक्षक भारती कार्यालयात येथे शिक्षक नेते सुनील गाडगे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. यावेळी शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप, विजय लंके, महिला राज्यप्रतिनिधी शकुंतला वाळुंज, ग्रथपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास गाडगे, श्रीकांत गाडगे, शरद धोत्रे, सुनील जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा महिलाध्यक्षा आशा मगर म्हणाल्या, सीबीएसई, आयसीसी, आयबीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापनाचे गुणदान कमी करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना दहावीच्या परीक्षेत गुणांची टक्केवारी जास्त राहील. 2019-20 या शैक्षणिक वर्षात अकरावी प्रवेशाच्या वेळी त्यांना प्राधान्याने प्रवेश मिळेल. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी मागे पडतील. त्यामुळे त्यांच्यावर मोठा अन्याय होईल. या विद्यार्थ्यांना सर्व विषयामध्ये पूर्वीप्रमाणे गुणदान लागू करावे. अशी मागणी शासनाकडे लावून धरली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा