माती हा शेतीचा आर्थिक कणा

नगर : कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने मृद आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांना जमीन आरोग्यपत्रिकेचे वाटप करण्यात आले.

डॉ. फरांदे : जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांना जमीन आरोग्यपत्रिकेचे वाटप

नगर – देशाचं भवितव्य मातीच्या आरोग्यावर अवलंबून आहे. प्रत्येक माणसाची नाळ मातीशी जुळलेली आहे. शेतीचे संवर्धन, मुल्यावर्धन जपणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. माती ही कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही. माती हा शेतीचा आर्थिक कणा आहे, असे प्रतिपादन कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा संचालक शिक्षण डॉ. अशोक फरांदे यांनी केले.

कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने मृद्‌ आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांना जमीन आरोग्यपत्रिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे, कृषी उपसंचालक विलास नलगे, जिल्हा मृद सर्व्हेक्षण मृद चाचणी अधिकारी शिल्पा गांगर्डे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय कातोरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, डॉ. अशोक कडलग आदी उपस्थित होते.

डॉ. फरांदे पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा हा कृषी प्रधान जिल्हा आहे.जमीन आरोग्य पत्रिका वाटपात अग्रेसर आहे. माती शास्त्र हा कारखानदारीचा पाया आहे. माती ही प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडित आहे. वातावरण बदलाचा परिणाम हा मातीवर होत आहे. माती खराब झाली, तर आरोग्य खराब होईल. आर्थिक स्तर खालावेत. शहरीकरण वाढते आहे. त्यात चांगली जमीन वाया जात आहे. आपण जमिनीपासून जेवढे घेतो, त्याच प्रमाणात जमिनीला अन्नद्रव्य देण्याची गरज आहे. जमिनीचे आरोग्य टिकावायचे असेल, तर जमीन आरोग्य पत्रिकेनुसार सेंद्रिय शेती करावी, असे ते म्हणाले.

जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे म्हणाले, 125 कोटी जनतेच्या अन्नधान्याची गरज भूमाता भागविते. तिला जपले पाहिजे. रासायनिक खताच्या अधिक मात्रेमुळे खर्चाचा ताळेबंद नसल्यामुळे भूमातेचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. शेतकऱ्यांना आता जागरूक व्हायला हवे. शासन तर त्यांच्या स्तरावर प्रयत्न करीत आहे. परंतु त्यात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. त्याशिवाय ही चळवळ होणार नाही.

यावेळी कृषी उपसंचालक विलास नलगे म्हणाले की, तीन माता महत्त्वाच्या आहेत. माता, गोमाता व भूमाता. जगातील सर्वांना पोषणाची ताकद ही भूमातेत आहे. ती सर्वश्रेष्ठ माता गणली जावी. 15 लाख हेक्‍टर क्षेत्र हे नगर जिल्हयाचे आहे. एकूण 1603 गावे आहेत. 1 लाख 26 हजार 601 नमुने गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे. जमिनी आरोग्य पत्रिकेनुसार शेतकऱ्यांनी शेती करावी.

जिल्हा मृद सर्व्हेक्षण मृद चाचणी अधिकारी शिल्पा गांगर्डे म्हणाल्या, 2015-16 व 16-17 च्या पहिल्या सायकलमध्ये 2 लाख 43 हजार 274 मातीचे नमुने तपासले असून, 7 लाख 79 हजार 692 आरोग्यपत्रिकांचे वाटप केले आहे. 2017-18 या दुसऱ्या सायकलमध्ये 1 लाख 10 हजार 399 मातीचे नमुने तपासले असून, 4 लाख 23 हजार 758 आरोग्यपत्रिकांचे वाटप केले आहे. तर 2018-19 मध्ये 1 लाख 26 हजार 601 मातीचे नमुने तपासण्याचे उद्दिष्ट असून, 6 लाख 55 हजार 11 आरोग्यपत्रिका वाटपाचे उद्दिष्ट आहे, असे सांगितले. प्रास्ताविक बाळासाहेब नितनवरे यांनी केले. आभार महेंद्र ठोकळ यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)