मृताच्या नातेवाईकांचा रुग्णालयासमोर ठिय्या

डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी : साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील प्रकार

शिर्डी – अपघातात जखमी झालेल्या साईबाबा संस्थानमधील रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील संबंधित डॉक्‍टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून, त्यांना निलंबित करण्यात यावे, तसेच मयताच्या पत्नीस साईबाबा संस्थानमध्ये नोकरीस घ्यावे, अन्यथा येथेच मृतावर अंत्यविधी करू, असा इशारा देत मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात गुरूवारी (दि. 6) ठिय्या दिला.

-Ads-

दरम्यान, याबाबत समजलेली माहिती अशी की, साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील कर्मचारी पोपट फकीरा गोसावी (वय 40, रा. वाळकी ता. राहता) हे 28 नोव्हेंबर रोजी दुचाकीवर कामाला येत होते. त्यांच्या दुचाकीला कुत्रे आडवे गेल्याने त्यांचा अपघात झाला. त्यांच्या डोक्‍याला व छातीला जबर मार लागला. त्यांना साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

“पोपट गोसावी यांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे. साईबाबा संस्थान मयत गोसावी यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असून, त्यांच्या पत्नीस नोकरीवर घेण्यात येईल. संबधित डॉक्‍टरांवर तत्काळ गुन्हा दाखल करता येत नाही, नसल्याची नवीन कायद्यात तरतूद असून, याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार करण्यात येईल.
-आनंद भोईटे (साई मंदिर सुरक्षा उपविभागीय पोलीस अधिकारी)

दरम्यान गोसावी यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती खालावली. नातेवाईकांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याची मागणी केली. मात्र संबंधित डॉक्‍टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र जेव्हा ते अत्यवस्थ झाले, तेव्हा डॉक्‍टरांनीच त्यांना दुसरीकडे हलविण्याचा सल्ला देत त्यांना रुग्णवाहिकेत हलवले. मात्र त्यानंतर पुन्हा तातडीने आयसीयूमध्ये हलवले. दरम्यान 5 डिसेंबर रोजी गोसावी यांचा मृत्यू झाल्याचे यावेळी नातेवाईकांनी सांगितले.

“दरम्यान मागील एक महिन्यात साईबाबा संस्थानमध्ये काम करत असलेले चार कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना अनुकंपाखाली तातडीने नोकरीस घ्यावे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना मेडिक्‍लेम सुविधा लागू करून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान पाच लाख रुपये रकमेचे क्रेडीट कार्ड साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांना देण्यात यावे.       -विठ्ठल पवार (संचालक, साईबाबा एम्प्लॉईज सोसायटी)

गोसावी यांच्या निधनाची वार्ता समजताच संस्थान कर्मचारी व नातेवाईकांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तसेच रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच संबंधित डॉक्‍टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व गोसावी यांच्या पत्नीस तातडीने संस्थांमध्ये कायमस्वरूपी कामावर रुजू करून घेण्यात यावे, अशी मागणी केली. सकाळी नऊ ते दुपारी 12 असा तीन तास ठिय्या दिला.

यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय नरोडे, डॉ. प्रीतम वडगावकर, प्रशासकीय अधिकारी अशोक औटी, साईबाबा मंदिराचे सुरक्षाअधिकारी आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक अरविंद माने, रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, साईबाबा एम्प्लाईज सोसायटीचे संचालक प्रताप कोते, विठ्ठल पवार यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

दरम्यान मृताच्या नातेवाईकांच्या समर्थनार्थ उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, साई निर्माणचे अध्यक्ष विजय कोते, शिवसेनेचे प्रमोद लभडे यांनी भेट घेऊन संस्थान प्रशासनास जाब विचारला. मात्र यावर दीर्घकाळ चर्चा होऊन सुद्धा संस्थान लेखी आश्वासन देण्यास तयार झाले नाही. अखेर आश्‍वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)