अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी अत्याचाराचा गुन्हा

श्रीरामपूर शहर व तालुक्‍यात पाळला कडकडीत बंद : पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

श्रीरामपूर – कारेगाव (ता.श्रीरामपूर) येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात रविवारी (दि.2) अत्याचार, मृत्यूस कारणीभूत होणे आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून करण्यात आल्याचा आरोप करुन, गुन्हेगारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शहर व तालुक्‍यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना मिळू शकला नाही. व्हिसेरा तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून, चार दिवसांनंतर अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतरच या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे कारण पुढे येऊ शकेल. आज या मुलीवर कारेगाव येथे पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

शनिवारी (दि. 1) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही अल्पवयीन मुलगी घराशेजारच्या शेतात शौचासाठी गेली होती. घरी आल्यानंतर ती बेशुद्ध झाली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिच्यावर अत्याचार करुन तिचा खून केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी केली होती. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, अभिजीत शिवथरे, पोलीस निरीक्षक विकास वाघ, गोविंद ओमासे, श्रीहरी बहिरट, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांनी कारेगाव येथे भेट देऊन चौकशी सुरु केली.

सकाळी या घटनेच्या निषेधार्थ शहर व तालुक्‍यात कडकडीत बंद पाळण्यात आला. आ. भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सिद्धार्थ मुरकुटे, प्रकाश चित्ते, सचिन गुजर, रिपब्लिकन पक्षाचे सुभाष त्रिभुवन, प्रकाश ढोकणे, संदीप मगर, रमादेवी धीवर, सुदर्शन शितोळे, अशोक बागूल, वंदना मुरकुटे, विजय खाजेकर, डॉ. सुधीर क्षीरसागर, राजू खरात यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी पुतळ्याजवळ निषेध सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थितांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर कारेगाव येथे या अल्पवयीन मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खा. सदाशिव लोखंडे, अविनाश आदिक, तहसीलदार सुभाष दळवी, अशोक बागुल, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सरपंच अनुराधा पटारे, बाळासाहेब पटारे, सुरेश चौदंते, सुभाष त्रिभूवन, संदिप मगर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या घटनेप्रकरणी कसून चौकशीची मागणी केली.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहीदास पवार यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सर्व बाजुंनी पोलीस तपास करीत आहेत. लवकरात लवकर वैद्यकीय अहवाल मिळावा म्हणून पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. चार दिवसात अहवाल उपलब्ध होईल, असे पवार यांनी सांगितले. कारेगाव, पढेगाव, टाकळीभान, बेलापूर येथेही घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)