टेल टू हेड मार्गावरील उद्‌भव भरून द्यावेत

शेवगाव – सध्या मुळा धरणातून सोडण्यात आलेले आर्वतन टेल टू हेड देऊन मार्गावरील सर्व उद्‌भव भरुन द्यावेत, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आज झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली आहे.
दुष्काळ स्थिती लक्षात घेऊन मुळेचे टेल टू हेड असे भरणे पूर्ण दाबाने पाणी देऊन करण्यात यावे, त्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा टिकवायचा असेल, तर सर्व उद्‌भव भरुन देणे आवश्‍यक आहे.

पाणी वापर संस्थेला मागणी प्रमाणे पाणी मिळत नसल्याने अनेकांच्या शेतीला पाणीच मिळत नाही. वडुले, वाघोली, बऱ्हाणपूर, आव्हाणे, दिंडेवाडी, सामनगाव, मळेगाव या डीवाय दोन चारीखाली येणाऱ्या गावासाठी शेवटचे आठ दिवस पाणी दिले जाते. त्याच काळात माका शाखेलाही पाणी दिले जात असल्याने सर्वांचे भरणे होत नाही. शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे पाणी मिळत नाही, तरीही पाणी संस्थेच्या माथी पाणी पट्टी थोपली जात असल्याने सर्व पाणीवापर संस्था थकबाकीत जातात.

-Ads-

यावेळी हेडच्या भागात पाण्याचा काळाबाजार होत असल्याचाही आरोप करण्यात आला. अधिकारी दबावाखाली येऊन पक्षपातीपणा करतात. तसेच चाऱ्या दुरुस्तीच्या नावे मोठा खर्च होऊनही कोणत्याच चाऱ्यांना दरवाजे, बारे, गेजपट्ट्या नाहीत. त्यामुळे पाणी सुटले की प्रत्येकवेळी जेसीबीद्वारे बारे लावून पाणी घ्यावे लागते. त्याच्या खर्चाचा भुर्दंड पाणी वापर संस्थेवर पडतो.

यंदा पावसाने दगा दिल्याने फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एक आवर्तन देण्यात यावे. पाणीवापर संस्थांच्या मागणीनुसार पूर्ण भरणे करण्यात यावे. तसेच पूर्ण दाबाने पाणी सोडावे. अधिकाऱ्यांनी मनमानी करू नये, अन्यथा राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली सिंचन भवनावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा बाजार समितीचे सभापती संजय कोळगे यांनी यावेळी दिला.

बैठकीत ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, बाजार समितीचे संचालक राजाजी बुधवंत, डॉ. सुधाकर लांडे, राजेंद्र देशमुख, राजेंद्र वाणी, शहादेव खोसे, कांता निकम, किशोर गाडगे, भरत वांढेकर आदी लाभार्थींनी चर्चेत सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)