महामार्गाचे काम सुरू करण्यासाठी दोन तास रास्तारोको

तहसीलदारांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे : रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा

पाथर्डी – शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 च्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी व बंद पडलेले काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी शहरातील जुन्या बसस्थानकाशेजारी नाईक पुतळ्यासमोर बुधवारी दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, येळीचे सरपंच संजय बडे, बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष अरविंद सोनटक्के, सामाजिक कार्यकर्ते सुनील पाखरे, आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड, मनसेचे किरण पालवे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, अविनाश टकले, बाबूराव खेडकर, भगवान बडे, वैजनाथ कराड आदी सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य केकाण म्हणाले, महामार्गाचे काम रखडल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अपघातांतअनेक लोकांना जीव गमवावा लागला. धोकादायक वळणामुळे परिस्थिती भयानक बनली आहे . निदान तात्पुरते खड्डे बुजवून तरी लोकांची अडचण दूर करावी. आता अंत पाहू नये. महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे.

सुनील पाखरे म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत वेळोवेळी तक्रारी करून काही फरक पडलेला नाही. आता महामार्गाचे काम तत्काळ सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. येळीचे सरपंच संजय बडे म्हणाले, काम सुरू करण्यासाठी काय अडचण आहे, याबाबत काहीच समजायला मार्ग नाही. महसूल प्रशासनाने मध्यस्थी करून लवकरात लवकर तोडगा काढावा.

आम आदमी पक्षाचे आव्हाड म्हणाले, आंदोलन करण्याचे निवेदन देतात ठेकेदारांच्या बगलबच्च्यांकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचे बळी गेल्याने ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

अरविंद सोनटक्के म्हणाले, काम महामार्गाचे आहे की गाव रस्त्याचे हेच समजायला तयार नाही. ठेकेदाराने सामाजिक कार्यकर्त्यांना दमदाटी करणे म्हणजे यांना पैशाचा माज आलेला दिसतो. ठेकेदाराने काम त्वरित सुरू करावे. जनतेचा अंत पाहू नये. आज आठवडे बाजार असल्यामुळे शहरात बाजारकरूंची गर्दी होती. त्यात दोन तास रास्तारोको आंदोलन झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तहसीलदार नामदेव पाटील यांनी येत्या 10 दिवसांत काम सुरू करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)