संविधानातील तत्त्वांचे अनुकरण करावे : बाळ कांबळे

कर्जत : येथील दादा पाटील महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ बाळ कांबळे, प्रमोद परदेशी, भास्कर मोरे.

कर्जत – भारत हा जसा विविधतेने नटलेला देश आहे, तसाच तो बहुभाषिक विविध जाती, धर्म, पंथ व संस्कृती असलेला देश आहे. या देशातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हक्क जपायचे असतील आणि देशाची अखंडता व एकात्मता टीकवायची असेल तर, प्रत्येकाने भारतीय संविधानाचा अभ्यास करून त्यातील तत्वांचे अनुकरण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी केले.

येथील दादा पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक मंडळ व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिन कार्यक्रमात आपले संविधान आणि आपण’ या विषयावर प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रा. भास्कर मोरे, प्रा. डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. प्रदीप मगर, प्रा. प्रदीप जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. कांबळे पुढे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यासपूर्ण रीतीने या संविधानाची निर्मिती केली असून, सर्व भारतीय नागरिकांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजनैतिक न्यायाची हमी दिली आहे. लेखन, वाचन व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. या संविधानाचे पावित्र्य टिकविण्यासाठी आपण आपले आचरण, संविधानिक जबाबदाऱ्या व कर्तव्यांचे पालन करावे. तरच संविधान दिन साजरा केल्याचे फलित नागरिकांच्या पदरात पडेल.

कार्यक्रमाच्या आरंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा व संविधानाचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. प्रदीप जगताप यांनी केले. यावेळी संविधानातील सरनाम्याचे सामुहिक वाचन करण्यात आले. डॉ. प्रमोद परदेशी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)