संगमनेर – तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीने खरिपापाठोपाठ रब्बी पिकांनाही दुष्काळाचा फटका बसला आहे. पावसाअभावी कोरडवाहू क्षेत्र धोक्यात आले असून तालुक्यात आतापर्यंत केवळ 11 टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शासनानेही तालुका दुष्काळी घोषित केला आहे. मात्र उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात नाही. पावसाअभावी खरीप हंगामातील शेतीपिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. हातातोंडाशी आलेले खरीप पीक वाया गेले आहेत.
पठार भागासहसह तळेगाव भागातील कांदा, बाजरी पीके पाण्याअभावी करपून गेली होती.
यंदा शेतकऱ्यांची दिवाळी आर्थिक टंचाईत गेली. आता रब्बीच्या आशाही धूसर झाल्या आहेत. तालुक्यात सरासरी 36 हजार 300 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी केली जाते. प्रत्यक्षात 3 हजार 458 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ 11 टक्के रब्बी पिकांची लागवड करण्यात आली असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात समोर आले आहे.
“यंदा पाऊस कमी झाल्याने संगमनेर तालुक्यात फक्त 11 टक्के रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. मात्र 19 नोव्हेंबरला झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्या ठिकाणी जमिनीत ओल असेल त्याठिकाणी शेतकऱ्यांनी हरबरा आणि ज्वारीच्या पेरण्या करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तालुक्यातील रब्बी पेरणीची आकडेवारी वाढेल.
-कारभारी नवले, तालुका कृषी अधिकारी संगमनेर.
पावसाअभावी रब्बीचे क्षेत्र ओस पडले आहे. शेततळे व विहिरींना पाणी असलेल्या शेतकऱ्यांनीच गहू, हरभऱ्याची पेरणी केली आहे. तालुक्यात गेल्या वर्षी 32 हजार 414 हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. यावर्षी अपुऱ्या पावसामुळे खरिपाचे उत्पादन देखील 50 टक्क्यांनी घटले आहे. पावसामुळे विहिरींना पाणी उतरले नाही.
परिणामी ठिकठिकाणी पाणी टंचाई जाणवू लागली आहे. काही शेतकऱ्यांनी आहे त्या पाण्यावर भाजीपाला लागवड केली असून भाजीपाल्यातून येणाऱ्या उत्पादनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. 11 टक्के पेरणी झाल्याने शेती व्यवसाय ठप्प झाला आहे. शेतमजूर बेरोजगार झाले असून ते कामाच्या शोधात इतर ठिकाणी स्थलांतर करत आहेत.
पिकाचे नाव / 2017-18 रब्बी हंगाम पेरणी हेक्टर मध्ये/ 21 नव्हेंबर 2018 रब्बी हंगाम पेरणी हेक्टर मध्ये .
ज्वारी / 5801 / 2593
गहू / 3566 / 284
हरबरा / 3872 / 370
मका / 734 / 211
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा