भ्रष्टाचारामुळे सामान्यांसह शेतकरीही देशोधडीला

तालुक्‍यातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाही होऊनही परिस्थितीत होईना सुधारणा


-शंकर दुपारगुडे

कोपरगाव : कोपरगाव तालुका दुष्काळाच्या झळांनी आधीच त्रस्त आहे. त्यात शासकीय मदतीच्या आशेवर जगत असलेल्या शेतकऱ्यांची विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी चिरिमिरी घेऊन आर्थिक लूट करीत असल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. त्यामुळे जनता मेटाकुटीला आली आहे. एकाच कामासाठी वारंवार शासकीय कार्यालयांत हेलपाटे रारून त्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे याची दखल घेऊन अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

यावर्षात कोपरगाव तालुक्‍यातील महसूल, पोलीस, नगरपालिका विभागाचे अनेक कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. कोपरगाव तालुक्‍यावर निसर्गाची वक्रदृष्टी कायमची आहे. तालुक्‍यात कधीच वेळेवर पाऊस पडत नाही. काही प्रमाणात पडलेल्या पावसाच्या पाण्यावर पिकांची लागवड होते. हाता-तोंडाशी आलेली पिके गारपीट, अवकाळी पावसाच्या तडाख्यात उद्‌ध्वस्त होतात. शेतकाऱ्यांचे त्यात लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होते.

त्यामुळे शासनाच्या मदतीची वाट पाहण्याची वेळे जगाच्या पोशिंद्यावर येऊन ठेपते. नुकसानीचा योग्य पुरावा, शेती उताऱ्यावर लाभधारकाचे नाव लावणे, अशा अनेक आडचणींवर मात करण्यासाठी शासकीय कागदपत्रांची जुळवाजुळ करावी लागते. काही कागदपत्रे वेळेच्या मर्यादेत दिले नाहीत, तर लाभ मिळणार नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे काहीतरी तजडोज करून ही कागदपत्रे मिळवावी लागतात. शेती नापिक, हताला काम नाही, शासनाची वेळेत मदत नाही, येणाऱ्या शासकीय योजनेमध्ये भ्रष्टाचाराची कीड लागलेली, त्यामुळे शेतकरी पूर्ण हतबल झालेला आहे.

तालुक्‍याचे हक्काचे 11 टीएमसी पाणी गेल्याने शेतकऱ्यांची दयनिय अवस्था झाली आहे. शासनदरबारी काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शेतकरी गेल्यास संबंधित काही अधिकारी-कर्मचारी त्यांच्याकडे चिरिमिरी मागून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करतात. वेळेत काम पूर्ण होण्याच्या आशेपोटी काही शेतकरी त्यास बळी पडतात. तालुक्‍यात अनेक प्रकरणांत लाच घेताना शासकीय कर्मचारी पकडले गेले आहेत.

तालुक्‍याला भ्रष्टाचाराची कीड लागली की काय, असा संशय बळावत आहे. काही दिवसांच्या अंतराने महसूल विभागाचे दोन व भूमिअभिलेख कार्यालयाचा एक कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ सापडले. महसूल व भूमिअभिलेख कार्यालयांतील कर्मचारी यापूर्वी अनेकवेळा लाच घेताना पकडले गेले आहे. काहींनी चिरिमिरी घेण्याच्या नादात काही अधिकारी, कर्मचारी मार खाऊन बदलून गेले.

काही महिन्यांपूर्वी एक पोलीस कर्मचारी लाखो रुपयांची लाच घेताना कोळपेवाडी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात आडकला होता. त्या प्रकरणात एकमेकांना साथ देणारे काही पोलीस कर्मचारी सामील होते. ते आजून बेपत्ता आहेत. कोपरगाव नगरपालिकेच्या अभियंत्याला पुणतांबा फाटा येथे लाच घेताना पकडण्यात आले होते. सहायक निबंधक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला बाळासाहेब मर्चंट बॅंकेत लाच घेताना रंगेहात पकडले होते.

शहरातील एका शाळेच्या लिपिकास किरकोळ लाच घेताना पकडण्यात आले होते. मात्र अद्यापही काही शासकीय अधिकारी, कर्मचारी गरीब शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व प्रकाराला काही अधिकारी-कर्मचारी अपवाद असतील. पण तालुक्‍यातील भ्रष्टाचार कमी झाला नाही. उलट वाढत आहे.

काही राजकीय कार्यकर्ते चुकीच्या मार्गाने काम करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून चिरिमिरी घेण्यास भाग पाडतात. चुकीच्या व बेकायदेशिर कामाला आर्थिक खतपाणी मिळाले की कामे सुलभ करण्यास कर्मचारी सज्ज होतात. त्यामुळे तालुक्‍यातील ही प्रशासनातील भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करण्याची गरज व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)