वरुणराजा रुसलेला आणि साथींची कृपा!

File photo

नेवासे तालुक्‍याची स्थिती; अस्मानी आणि सुलतानी संकट एकाचवेळी

-गणेश घाडगे

-Ads-

नेवासे – निसर्गाचा लहरीपणा ग्रामीण भागाच्या मुळावर चांगलाच उठला आहे. यंदा संपूर्ण पावसाळा संपत आला असला तरी रुसलेला मेघराजा बरसण्यास तयार नाही. उसावर हुमणी तर गावात डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साथीच्या आजारांनी थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळ, हुमणी व साथीच्या आजारांच्या दुष्ट संकटात नेवासे तालुक्‍याचा ग्रामीण भाग होरपळून निघत आहे. यंदा पावसाने पूर्ण पाठ फिरवल्याने शेती व्यवसाय संकटात सापडला आहे.

गणपती-गौरीत बळीराजाला पावसाची मोठी अपेक्षा होती; मात्र पावसाने साफ निराशा केली. आताही ढग दाटून येतात. विजा चमकतात; मात्र पाऊस हुलकावणी देत आहे. त्यामुळे बळीराजा कमालीचा अस्वस्थ झाला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. तालुक्‍यात ऊस शेती बरोबरच कपाशीदेखील मोठ्या प्रमाणात घेतली जाते. या वर्षी बोंड अळीने व कमी पावसाने ही पिकेदेखील नष्ट झाली आहेत. त्यामुळे दसऱ्याला पांढरे सोने हाती येण्याची शक्‍यता नाही.

पाऊस नसल्याचा सर्वाधिक गंभीर परिणाम उसावर झालेला दिसत आहे. उसासारखे भरवशाचे पीक हुमणीच्या विळख्यात सापडल्याने ऊस उत्पादक अक्षरशा रडकुंडीला आला आहे. कितीही व्यवस्थापन केले व कितीही औषधे फवारली तरी हुमणी कीड त्याला दाद देण्यास तयार नाही. हजारो हेक्कटर एकर क्षेत्र हुमणीमुळे बाधित झाल्याचा अंदाज आहे. पावसाअभावी उसाला तेज नाही त्यात आता खोडकिड्याने तोंड वर काढले आहे. साहजिकच यंदा उसाचा उतारा निम्याहून कमी येण्याची भीती ऊस उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.

हुमणीच्या संकटापुढे ऊस उत्पादकांनी हात टेकले आहेत. उसाबरोबरच आता कांदाही हुमणीचा शिकार होताना दिसू लागला आहे. टोमॅटो, गवार या पिकावरही अळीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. एकंदरीत पाऊस न झाल्याने शेती व्यवसाय सर्व बाजूने अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या आठ-दहा वर्षांत अनुभवला नसेल, अशा दुष्काळाचे सावट सध्या आहे. धरणांचे पाणलोट क्षेत्र वगळता अद्याप कोणत्याही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. जूनच्या सुरुवातीला पडलेल्या एक-दोन पावसाच्या सलामीने मोठा उत्साह निर्माण झाला होता. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस बरसेल असे वाटत असतानाच संपूर्ण पावसाळ्यात पावसाने मारलेली दडी काळजाची ठोका चुकवणारी ठरली आहे. तालुक्‍यातील अनेक ठिकाणचे साखळी बंधारे कोरडेठाक पडले आहेत. शेती व पिण्याचा पाण्याचे संकट उभे राहिले आहे. येत्या काही महिन्यांतच पाण्याची दाहकता उग्र रूप धारण करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. नवरात्रीपर्यंत अजूनही काही का होईना पाऊस पडेल, अशी भोळी भाबडी अपेक्षा लोकांमध्ये आहे; मात्र या काळातही पाऊस न झाल्यास दुष्काळ जाहीर करावा लागेल.

पाऊसच पडला नसल्याने तसेच हवमानातील वारंवारच्या बदलाने सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लू, डेंगीसदृश्‍य आजार, गोचिडताप, खोकला, सर्दी ताप आदीचे रुग्ण वाढले आहेत. नेवासे, सोनई, घोडेगाव, कुकाणे, भेंडे, सलाबतपूर, प्रवरासंगम, माका, नेवासेफाटा आदी ठिकाणच्या दवाखान्यांत प्रचंड गर्दी होत आहे. अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल असल्याची संख्या ही लक्षणीय आहे.

तालुक्‍यात स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यूदेखील झाला आहे.नदीकाठच्या गावात डासांचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे. पांढऱ्या पेशी कमी होणे, ताप येण्याची लक्षणे अधिक आहेत. त्यामुळे गावा-गावांत व वाड्या-वस्त्यांवर स्वच्छता ठेवणे, कोरडा दिवस पाळणे व धुराची फवारणी केल्यास अशा रोगांना प्रतिबंध बसू शकेल. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांना हवी हुमणीच्या नुकसानीची मदत

तालुक्‍यात दोन सहकारी साखर कारखाने आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ऊस पिकवणारा तालुका म्हणून नेवाशाची ओळख आहे. हुमणीने येथील ऊस क्षेत्र पोखरले आहे. ऊस क्षेत्राचा पंचनामा करून शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवण्यासठी ज्ञानेश्वर व मुळा कारखान्याने प्रयत्न करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)