शिकारीसाठी लावलेल्या खटक्‍यात बिबट्या अडकला

पाच तासाच्या अथक परिश्रमानंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश


 सोनई शनीशिंगणापुर पोलिसांची तत्परता

चांदा – नेवासा तालुक्‍यातील बऱ्हाणपूर येथील शेताजवळील डांबरी रस्त्यालगत शिकारीसाठी लावलेल्या खटक्‍यात शिकार आलीच नाही, मात्र त्यात बिबट्याचा पाय अडकला. तब्बल पाच तासाच्या अथक परिश्रमातून वन विभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. सोनई, शनीशिंगणापुर पोलिसांनी वन विभागाला सर्वातोपरी सहकार्य केल्याने अखेर बिबट्या जेरबंद झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बऱ्हाणपूर येथून कांगोणी फाट्याकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यालगत सोसायटीचे चेरमन प्रदिप चव्हाण यांच्या शेताजवळ रस्त्यालगत छोटया प्राण्यांच्या शिकारीसाठी खटका लावला होता, आज सकाळी त्याच शेताच्या शेजारी भानुदास चव्हाण आपल्या पिकांना पाणी देत होते साधारणपणे साडेसातच्या सुमारास त्यांच्या बांधावर बिबट्या त्यांनी पाहिला तो तसाच पुढे ऊसाच्या कडेने रस्त्यालगत लावलेल्या खटक्‍यात जाऊन अडकला.

तोपर्यंत चव्हाण यांनी त्यांचा मुलगा संकेत यास बिबटयाची माहिती दिली, त्यांनी रस्त्यावर येऊन पाहिले तर बिबटया जोरजोरात डरकाळ्या टाकत होता. चव्हाणांनी तातडीने छावाचे अध्यक्ष अशोक चव्हाण, प्रदिप चव्हाण यांना माहिती दिली. अशोक चव्हाण व पत्रकार अरुण सोनकर यांनी घटनेची माहिती वनक्षेत्रपाल भास्कर शिंदे यांना दिली. शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सुत्रे हलवली. नेवासा टिमला ताबडतोब घटनास्थळी पाठवले. मात्र तोपर्यंत बिबट्या अडकल्याची वार्ता बऱ्हाणपूर, चांदा, कांगोणी, घोडेगांव आदी ठिकाणी पोहचली.

घटना पाहण्यासाठी जवळपास दिड दोन हजाराचा जनसमुदायाने गर्दी केली. परिस्थिती पाहून छावाचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिंगणापुर पोलिस ठाण्याला माहिती दिली. काही वेळातच पोलीस हजर झाले, मात्र गर्दी जास्त असल्याने खबदारीचा उपाय म्हणून सोनई पोलिसांची टीम घटनास्थळी हजर झाली.

बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी वनाधिकारी भास्कर शिंदे यांनी आपले सहकारी वनपाल नामदेव मते, सेवानिवृत्त वनपाल ढेरे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेत व्युहरचना केली. जिल्हा सहायक वनाधिकारी रमेश देवखिळे, उपवनसंरक्षक अधिकारी रेड्डी यांच्या सुचनेनुसार हालचाली सुरू केल्या. मात्र घटना रस्त्यालगत असल्याने गर्दी कमी होईना. त्यामुळे बिबटयाला पकडणे अवघड झाले होते.

भुल देऊन पकडण्यासाठीचा प्रयत्न शक्‍य होईना, शेवटी साधारणपणे एक वाजेच्या दरम्यान वन अधिकारी गावातील तरुणांच्या मदतीने पिंजऱ्याचे दार उघडे ठेवुन पिंजरा सरकत सरकत बिबट्याजवळ आणला, उन्हाने तापलेला आणि तहानलेल्या बिबट्याने झटकन पिंजऱ्यात झेप घेतली, मात्र त्यांचा पाय खटक्‍यात तसाच राहिला पिंजऱ्याचे दार बंद करून वन विभागाचे कर्मचारी व युवकांनी खटक्‍याची साखळी तोडून बिबट्या जेरबंद केले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

या मादी बिबटयाला लोहगावच्या वन विभागाच्या क्षेत्रात नेऊन तेथे त्याच्या पायात अडकलेला खटका काढण्यात आला असुन त्यावर औषधोपचार करण्यात आले. तो व्यवस्थित झाल्यानंतर त्याला निर्सगात मुक्त करण्यात येईल असे वनक्षेत्रपाल भास्कर शिंदे यांनी सांगितले. पशुवैदयकिय अधिकारी डॉ. मेहेत्रे यांनी विशेष सहकार्य केले. शनीशिंगणापुर पोलिस स्टेशनचे पी. एस. आय. बेंद्रे पोलिस कर्मचारी बोठे, गरगडे, वाघ, म्हस्के, काळे तर सोनई पोलीस ठाण्याचे माने, वाघमोडे, शिंत्रे, काळे आदिंनी बंदोबस्त ठेवला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)