राजकीय साठमारीत क्रीडा संकुलाची दूरवस्था

-गणेश घाडगे 

नेवासे – नेवासे शहरालगत असलेल्या नेवासे-उस्थळ रस्त्यावर मारुतीनगर परिसरात क्रीडा संकुलासाठी जागा मिळाली. त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र हे काम सध्या अर्धवट अवस्थेत आहे. प्रशासकीय व राजकीय साठमारीत या संकुलाच्या कामाला ग्रहण लागले. तब्बल 14 वर्षांच्या काळात या क्रीडा संकुलाकडे क्रीडा अधिकाऱ्यांसह माजी आमदार शंकरराव गडाख, विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे, खासदार सदाशिव लोखंडे माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे तालुक्‍यातील क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला आहे.

नेवासे शहरात मागील वर्षात ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाले. नेवाशाचे हे क्रीडा संकुल प्रभाग 17 मध्ये असून, या ठिकाणचा उमेदवार हा येथील प्रथम नगराध्यक्ष होणार होता. त्यामुळे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी, तर भाजपाच्या विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या मुख्य उमेदवारांतच लढत झाली. येथील नागरिकांनी या क्रीडा संकुलाच्या विकासासाठी भाजपच्या संगीता बर्डे यांना प्रथम नगराध्यक्ष केले. मात्र त्यांच्याकडून देखील क्रीडासंकुलाबाबत तरुणांचा पाठपुराव्याबाबत भ्रमनिरास झाला असल्याचे क्रीडा संकुलाच्या वस्तुस्थिती वरून दिसते.

“मागील पावणेदहा वर्षांच्या कालावधीत या क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध करण्यास आजी-माजी लोकप्रतीनिधी निष्क्रिय ठरले आहेत. तालुक्‍यातील खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय खेळात कौशल्य दाखवले असून, अनेकांनी आपले व तालुक्‍याचे नाव मोठे केले आहे. संकुलासाठी पालकमंत्री राम शिंदे यांनी साडेचार वर्षांच्या काळात बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात क्रीडा संकुलासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करावी.
-मुकुंद बाबा अभंग, अध्यक्ष, संस्कृती युवा प्रतिष्ठान

नेवासे शहरासह तालुक्‍यातील खेळाडूंसाठी मंजुरी मिळालेल्या क्रीडा संकुलाचे काम काही प्रमाणात सुरु झाले होते. मात्र नेवासे क्रीडा संकुलाचे काम जिल्हा व तालुका क्रीडाअधिकारी व राजकारण्यांच्या अनास्थेमुळे तब्बल 14 वर्षांपासून रखडले आहे.

“आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांबरोबर दोन वेळेस बैठका घेतल्या होत्या. मात्र अर्धवट कामाचे जुने रेकॉर्ड सापडत नसून अतिक्रमणाच्या तोडग्यामुळे व अर्धवट कामामुळे नवीन निधी उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. अर्धवट काम नियमाप्रमाणे झाले नसून, यामधील जुना निधी शिल्लक असून, पूर्ण काम झाल्याशिवाय पुढील निधी येणार नाही. आ. मुरकुटे यांनी नवीन प्रस्ताव पाठवला आहे.                                                             -ज्ञानेश्वर पेचे, भाजपा तालुका अध्यक्ष नेवासे

तालुक्‍यातील खेळाडूंना हक्काच्या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध व्हावे, तसेच त्यांच्यातील क्रीडा गुणांचा विकास होऊन त्यांच्या कला गुणांना व्यापक वाव मिळावा, या उदात्त हेतूने शासनाने नेवासा शहरातील मारुतीनगर भागात 2005 साली क्रीडा संकुलाला मान्यता दिली. त्यामुळे तालुक्‍याच्या विकासात्मक सौंदर्यात भर पडणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र राजकीय व प्रशासकीय साठमारीत हे काम आडकल्याने क्रीडापटूंचा चांगलाच भ्रमनिरास झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)