ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन भूदानयज्ञची जागा केली उपलब्ध
नेवासे – नेवासे तालुक्यातील पुनतगाव येथे विठ्ठल रामभाऊ गंधारे यांच्या मृत्यूनंतर पुत्रवियोगाने त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई रामभाऊ गंधारे यांचेही निधन झाले. या दोघांचेही अंत्यविधी रस्त्यावर अशा मथळ्याखाली दैनिक प्रभातने वृत्त प्रसिद्ध करताच ग्रामपंचायतने ग्रामसभा घेऊन भुदानयज्ञची जागा उपलब्ध केली. यामुळे दैनिक प्रभातचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावकऱ्यांनी दैनिक प्रभातचा अभिनंदनचा ठराव संमत केला आहे.
15 दिवसांपुर्वी विठ्ठल गंधारे यांच्या निधनानंतर जायकवाडीला नदीने पाणी चालु असल्याने त्यांचा अंत्यविधी रस्त्यावरच करावा लागला होता. गंधारे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने स्मशानभूमी संदर्भात शासनास वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला होता पण त्यांच्या पत्राची शासनाने दखल घेतली नाही. पुनतगावमध्ये स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी हे प्रवरा नदीपात्रात होत होते. पण पावसाळ्यात नदीला पाणी आल्यानंतर व त्या नदीपात्रावर असलेला बंधारा भरल्यानंतर सहा ते सात महीने नदीपात्रात पाण्याचा तुंब असल्याने अंत्यविधी रस्त्यावरच करावा लागत असे.
“या आगोदर जागेअभावी अंत्यविधी रस्त्यावर करावे लागले, ग्रामसभेने स्मशानभुमीसाठी भुदानयज्ञ जागेचा ठराव दिला असुन शासनाने या जागेवर स्मशानभूमीची त्वरित नोंद न लावल्यास यानंतर तहसील कार्यालयासमोर अंत्यविधी करणार आहोत. – दिपक धनगे, ग्रामस्थ.
शासनास वेळोवेळी स्मशानभूमी संदर्भात पत्रव्यवहार करूनही शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने शासनाचा निषेध म्हणुन लक्ष्मीबाई गंधारे यांचा अंत्यविधी पुनतगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले होते. या घटनेची माहिती कळताच नेवासा महसूलचे सर्कल भाऊसाहेब शेळके व नेवासा पोलीस ठाण्याचे देवकाते हे घटनास्थळी दाखल झाले. पुनतगावचे माजी सरपंच साहेबराव पवार यांनी त्वरीत ग्रामसभा घेवून विभागीय आयुक्त नाशिक यांना मागणी जागेचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांना सादर करण्याचे आश्वासन दिल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. या आश्वासनामुळे ग्रामपंचायतीसमोर होणारा अंत्यविधी हा पुनतगाव खुपटी या मुख्य मार्गावर करण्यात आला.
सोमवारी ( दि.26) ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेत पुनतगावमधील भुदानयज्ञ ची जागा गावातील स्मशानभूमीसाठी मिळणेकामी आदेश होण्यासाठी ग्रामसभेची लेखी मान्यता दिली. या ठरावाची सुचना ग्रामपंचायत सदस्य कादर अहमद शेख यांनी मांडली, त्यास सदस्या नंदाबाई वसंत वाघमारे यांनी अनुमोदन दिले व ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी जागेचा मार्ग मोकळा झाला.
ग्रामपंचायतीने दिलेल्या जागेच्या ठरावातील जमिनीवर शासनाने आठ दिवसात स्मशानभूमी ची नोंद न लावल्यास कुठलीही पुर्वसुचना न देता पुनतगाव ग्रामस्थ नेवासा तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे, ग्रामपंचायत सदस्य उज्वला वाकचौरे, मंगल धनगे, निता वाकचौरे, अशोक वाकचौरे, त्रिंबक वाकचौरे, दत्तात्रय गाडेकर, सतिष वाकचौरे, बापुसाहेब काळे,संजय गंधारे, पोपट काळे, संदिप काळे, अनिल वाकचौरे यांनी दिला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा