नेवासेत डाळींब, कांदा मार्केट सुरू करा : मनसे

नेवासेफाटा : नेवासे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शेतकऱ्यांसाठी कांदा व डाळींब मार्केट सुरू करण्यात यावे, याबाबत वारंवार निवेदने देऊनही दखल न घेतल्याने अखेर मनसेतर्फे 3 डिसेंबरपासून तीन दिवसीय आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामध्ये पहिल्या दिवशी उपोषण, दुसऱ्या दिवशी रास्तारोको तर, तिसऱ्या दिवशी मार्केट कमिटीला टाळे ठोकण्याचे आंदोलन अशी आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.

याबाबत सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेवासे हे तालुक्‍याचे महत्वाचे ठिकाण असूनही येथे कांदा व डाळींब मार्केट सुरू करण्यात आले नाही. येथे मार्केट सुरू करावे म्हणून, आजपर्यंत अनेकवेळा निवेदने दिली मात्र, त्याची दखल मार्केट कमिटीतर्फे घेतली नाही, म्हणून तीन दिवशीय आंदोलनात दि. 3 डिसेंबर रोजी मार्केट कमिटीसमोर उपोषण, 4 डिसेंबरला रास्तारोको व दखल न घेतल्यास 5 डिसेंबर रोजी टाळे ठोकण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

आठ वर्षात मार्केट कमिटीमध्ये कोणतीही सुधारणा न करणाऱ्या बेजबाबदार सचिवाची बदली करण्यात यावी, मार्केट कमिटीकडे कोट्यवधी रुपयांचा फंड जमा असून तो जनतेसमोर सादर करण्यात यावा, शेतकरी, हमाल यांच्यासाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात यावी, सुरक्षाभिंत बांधण्यात यावी, वेड्या बाभळीचा परिसर स्वच्छ करण्यात यावा, तसेच येथे डाळींब व कांदा मार्केट सुरू करण्यात यावे अशा मागण्या केल्या आहेत.

निवेदनावर मनसेचे शहराध्यक्ष संतोष गव्हाणे, जिल्हा उपाध्यक्ष विलास देशमुख, उपाध्यक्ष दीपक परदेशी, विभाग अध्यक्ष रवींद्र पिंपळे, अविनाश गाढवे, महिला आघाडी प्रमुख अर्चना गव्हाणे, जिल्हा उपाध्यक्ष रजनी पडूंरे, तालुकाध्यक्ष दिगंबर पवार, योगेश काळे, वसीम ईनामदार यांच्या सह्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)