कुकाण्याच्या भर बाजारपेठेत अवैध धंद्याचा सुळसुळाट

नेवासे – कुकाणे येथील पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर जुगार, मटका, दारू, खुलेआम सुरू आहे. येथील सार्वजनिक बांधकाम खात्याची वसाहत दिवसभर मटका, जुगार, दारुडे यांच्यामुळे गजबजून गेलेली असते. ही वसाहत जुगाराचा अड्डा बनली आहे.

कुकाण्यातील अवैध धंद्यांना कोणाचा वरदहस्त आहे, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. एकीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा अवैध धंद्याची माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर करतात, तर दुसरीकडे कुकाण्यात मात्र पोलिसांच्या आशीर्वादाने मटका खुलेआम सुरू आहे. मटका, जुगार, दारूमुळे अनेकांचे प्रपंच उद्‌ध्वस्त झाले आहे; मात्र पोलीस बघ्यांची भूमिका का घेत आहेत, या प्रश्‍नाचे उत्तर मिळत नाही. कुकाणे गावातदेखील अवैध धंदे खुलेआम चालू आहेत.

-Ads-

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आवारात मोठमोठी चिंचेची झाडे आहेत. चोहोबाजूंनी भिंती आहेत. या ठिकाणी दिवसभर गर्दी असते. याच विभागाच्या प्रवेशद्वाराजवळदेखील मटक्‍याची टपरी खुलेआम सुरू आहे. तिथे गर्दी असते. कुकाण्यातील जेऊर चौकात मटक्‍याचे मोठे दुकान असून या दुकानावर परिसरातील नागरिक गर्दी करतात. या दुकानाच्या प्रवेशाद्वारावर पडदा लावलेला असतो. आतमध्ये भिंतीवर आकडयाचे तक्ते कल्याण, मुंबई व भुंगा या नावाने लावलेले आहेत. यामध्ये आठवडाभराचे आकडे लावले आहेत.

त्याच्या अंदाजावरून तरुण मटक्‍याचे आकडे लावतात. या अवैध धंद्यासाठी फक्त वही व पेन एवढेच साहित्य लागत असते. सर्व व्यवहार फोनवर चालतात. या भागात बनावट देशीदारूदेखील खुलेआम विकले जातात. मटक्‍याबरोबर दारूची दुकाने बाजारपेठेत आहेत. मुख्य रस्त्यावर दारुडे पडलेले असतात. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)