क्रीडा संकुलाअभावी नेवाशातील खेळाडूंचे नुकसान

तालुक्‍यातील खेळाडूंच्या पालकांची खंत : आजही सरावासाठी हक्काची जागा नाही


-गणेश घाडगे

नेवासे : राज्य शासन शेती, आरोग्य, शिक्षण क्षेत्राबरोबर विविध खेळांवर कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र नेवासा तालुक्‍यासाठी मंजूर झालेले क्रीडा संकुल अद्यापही अपूर्ण असल्याने खासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. तसेच खेळाडूंना सरावासाठी हक्काची जागा अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे खेळाडूंचे भवितव्य आजही अंधारात आहे.

पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब, खेलोगे तो बनोगे नही लाबजबाब असेच म्हणण्याची वेळ खेळाडूंच्या पालकांवर आली आहे.
तालुक्‍यातील अनेक विद्यार्थी विविध खेळांच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. या खेळांमधूनच विद्यार्थ्यांना पोलीस, सैन्य दलात नौकरी मिळवत स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे. जे विद्यार्थी खेळात राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकले, त्यांना त्यांच्या 10 वी व 12 वी च्या परीक्षेत वाढीव गुण मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत वाढ होत असते.

नेवासे तालुक्‍यातील क्रीडा संकुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने खेळाडूंना अद्यापही सरावासाठी हक्काची जागा मिळालेली नाही. तालुक्‍यासाठी नेवासा शहरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर काही वर्षांपूर्वी सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुलासाठी निधी मंजूर होऊन त्याचे काम देखील देखील सुरू झाले. परंतु काही कारणांमुळे हे काम थांबले ते कायमचेच. या कामासाठी आलेल्या विटा, वाळू, खडी व अन्य वस्तू चोरी गेल्या आहेत.

नगरचे क्रीडा आयुक्त राजाराम माने यांनी या क्रीडा संकुलास प्रत्यक्ष भेट देऊन हे काम पूर्णत्वाकडे नेण्याचे आश्‍वासन देखील काही वर्षांपूर्वी दिले होते. त्यामुळे तालुक्‍यातील खेळाडूंच्या अशा पल्ल्‌विती झाल्या होत्या. मात्र काम रखडल्याने त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला. क्रीडा संकुल व योग्य मार्गदर्शनाअभावी आजची तरुण पिढी खेळाकडे आकर्षित न होता व्यसनांच्या आहारी जात आहे. काही ठराविक तरुण विविध खेळांसाठी पुणे, कोल्हापूर या सारख्या शहरांकडे जात आहेत.

खेळाची आवड असूनही परिस्थिती अभावी अनेक तरुणांना आपली आवड जोपासता येत नाही. त्यात जमेची बाब अशी की, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांनी नेवासेफाटा येथील त्रिमूर्तीनगर येथील संकुलात सर्व सुविधायुक्त कुस्ती ऍकॅडमीची निर्मिती केली आहे. या ठिकाणी माती व मॅटवरील कुस्तीचे प्रशिक्षण मोफत दिले जाते.

नेवासा तालुक्‍यासाठी मंजूर झालेले. मात्र अपूर्ण अवस्थेतील क्रीडा संकुल लवकरात लवकर खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिल्यास व्यसनांच्या आहारी जात असलेला तरुण खेळात लक्ष घालून नेवासा तालुक्‍याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावल्याशिवाय राहणार नाही, अशी खंत त्रिमूर्तीचे कुस्ती प्रशिक्षक व राष्ट्रीय कुस्ती पंच संभाजी निकाळजे यांनी प्रभातशी बोलताना व्यक्त केली. नेवासे क्रीडा संकुलाचे काम राजकारण्यांच्या अनास्थेमुळे व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बंद पडून एक तप संपले. तरी देखील संत ज्ञानेश्वरांच्या नगरीत खेळाडूंना क्रीडा संकुल पाहायला मिळत नाही.

क्रीडा संकुलाचे काम एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे बंधन असतानाही मागील चौदा वर्षांपासून हे काम रखडलेले आहे. नेवासे तालुक्‍यातील खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारांत आपले कौशल्य दाखवीत असून, या खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये संधी मिळण्यासाठी क्रीडा संकुलाची अंत्यत गरज आहे.

“क्रीडा संकुला अभावी व योग्य मार्गदर्शना अभावी आजची तरुण पिढी व्यसनाधीन बनत चालली आहे. खेळांची आवड निर्माण होण्यासाठी तालुक्‍यात क्रीडा संकुल महत्वाचे आहे. या अर्धवट क्रीडा संकुलाचे काम लवकर पूर्ण करून खेळाडूना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे.

-संभाजी निकाळजे, कुस्ती प्रशिक्षक.


“क्रीडासंकुल ही काळाची गरज असून, आमच्यासारख्या ग्रामीण भागातील मुलींना शाळेव्यतिरिक्त कुठेच खेळाच्या सरावासाठी जागा नाही. त्यामुळे आम्ही विविध स्पर्धांपासून वंचित राहात आहोत. आम्ही राज्याच्या संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र क्रीडासंकुल नसल्याने आम्हाला सरावासाठी हक्काची जागा नाही.

-प्रणाली प्रशांत बागडे, राष्ट्रीय खेळाडू


“ग्रामीण भागात मुलींसाठी स्वंतत्र क्रीडा संकुलाची गरज आहे. मुलींना आपल्यातील कलागुणांना वाव देता आला पाहिजे. कोणत्याही खेळाचा सराव करण्यास मैदान पाहिजे. मला देखील खो-खोचा सराव करताना फार अडचणी आल्या. तालुक्‍यात क्रीडा संकुल असते तर मला सरावासाठी कुठेच फिरायची गरज नव्हती.

-किरण गव्हाणे, राज्य खो-खो संघ कर्णधार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)