#न्यू_विंडो : मर्यादाभंग केला, की अवमान ठरलेलाच (भाग १)

-भागा वरखडे

राजकीय पक्षांची कार्यपद्धती ठरलेली असते. कुणी कशावर आणि केव्हा भाष्य करावं, याचे काही संकेत असतात. ते पाळले, की राजकीय नेता, कार्यकर्ता अडचणीत येत नाही; परंतु राजकीय नेत्याची जिभ एकदा सैल सुटली, की मग त्याविरोधात प्रतिक्रिया उमटतात. पक्षातून जाब विचारला जातो. कधी कधी पक्ष संबंधित नेत्याच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष करतो.

फारशी दखल न घेता तुमच्या वक्तव्याला आमच्या लेखी काहीच किमंत नाही, असं पक्षातील नेते दाखवित असतात. असं असलं, तरी कुठं ना कुठं संबंधित नेत्याला त्याची चूक लक्षात आणून द्यावी लागते. तशी ती दिली नाही, तर जिभ सैल सुटलेल्या नेत्यांचं फावतं. आपल्याला कुणीच काही बोलत नाही, त्यामुळं आपल्या मताला पक्षाचीही संमती आहे, असं नेत्यांना वाटायला लागतं. बऱ्याचदा पक्षात आपल्याला गृहीत धरलं आहे, आपल्याला काडीचीही किमंत नाही, असं वाटायला लागतं, तेव्हा चमत्कारिक किंवा वादग्रस्त विधानं करून जनतेचं आणि पक्षाचंही लक्ष वेधण्याचा प्रयत्न अशी मंडळी करीत असतात. अशा विधानामुळं आपण पक्षाच्या विरोधात भूमिका घेत आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही. खरं तर अशा नेत्यांना संबंधित पक्षांनी जाब विचारायला हवा; परंतु बऱ्याचदा पक्षालाही एक एक नेता सांभाळायचा असतो. त्याला दुखावलं, तर काय, अशी भीती पक्षाच्या नेत्यांच्या मनात ठाण मांडून असते. त्यामुळं अशा वाचाळ नेत्यांना अटकाव करण्यास पक्ष तयार नसतो. पक्षापेक्षा नेते मोठं होण्यात असं केलेलं दुर्लक्षही कारण असू शकतं.

शिवाजीराव कर्डिले हे नगर जिल्ह्यातील असंच बेरकी नेतृत्त्व. एका भाषणात त्यांनी मी तेल लावलेला पैलवान आहे. कुणाच्या हातात मी गवसणार नाही, असं म्हटलं होतं. या तेल लावलेल्या पैलवानाला अनेकांनी राजकीय मैदानात मदत केली. दादा पाटील शेळके यांनी दिलेल्या विजयाताई कुटे यांच्या विरोधात विधानसभेची जंग करून त्यांनी राजकीय श्रीगणेशा केला. त्या वेळी त्यांना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांची मदत झाली होती, हे त्रिवार सत्य आहे. त्यानंतर युती, आघाडी, राष्ट्रवादी, भाजप असा त्यांचा प्रवास झाला. काही काळ ते मंत्रीही होते. शरद पवार यांच्या भाषेत “सोधा’ राजकारणाच्या विद्यापीठाचे ते कुलगुरू!

स्वतः चा मतदारसंघ चार तालुक्‍यात विभागला गेल्यानंतरही त्यांनी तीन तालुक्‍यातील मतदारसंघातून निवडून येण्याची किमया केली. त्यासाठी पक्षाच्या भिंती ओलांडून प्रसंगी दुसऱ्या पक्षातील नेत्याला फूस लावून, निवडणुकीच्या रिंगणात उभं करायचं आणि स्वतः निवडून यायचं असं गणित त्यांनी जमविलं. अर्थात त्यांच्या पदरी पराभव आला नाही, असं नाही. कुणाशी कधी जुळवून घ्यायचं आणि कुणाला कसा डाव टाकायचा, हे तेल लावलेल्या पैलवानाकडूनच शिकावं. त्यांच्या मतदारसंघाची रचना लक्षात घेता त्यांना अनेक नेत्यांची मदत लागत असते. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशी नीती त्यांनी राजकारणात वापरली. काही वर्षांपूर्वी विखे यांच्याच शैक्षणिक संकुलाला वडगावगुप्तानजीकची जागा देण्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या कर्डिले यांच्या भूमिकेत नंतर कसा बदल झाला, हे त्यांना आणि विखे यांनाच माहीत.

विखे आणि कर्डिले यांच्या भूमिका कायमच परस्परांना साह्यभूत ठरल्या आहेत. पक्ष त्यांच्या समझोता एक्‍सप्रेसच्या आड कधीच आले नाहीत. दोघांनी परस्परांना वरवर विरोध केलाही असेल; परंतु तो नाटकी होता. राजकारणाची फारशी समज नसणारेही त्याबाबत विश्‍वासानं नक्कीच सांगतील, इतकं दोघांचं मेतकूट जमलं आहे. त्याशिवाय का बाळासाहेब विखे यांचे मावसभाऊ ऍड. सुभाष पाटील यांनी कर्डिले यांच्या व्यासपीठावर हजेरी लावून विखे यांच्या सुदर्शन चक्राची आठवण करून दिली? आपली उमेदवारी तनपुुरे यांच्या पराभवासाठी होती आणि ती विखे यांच्या सांगण्यावरूनच होती, असं सांगायला ते विसरले नाहीत.

कर्डिले यांचा पराभव एकदा विखे यांनी केला असं पाटील म्हणाले असले आणि त्यांनी खा. दिलीप गांधी यांना मदत केली असं जाहीरपणे सांगितलं असलं, तरी खा. गांधी यांच्या कोपरापासून हात जोडण्याच्या कृतीनं त्यांचाही विखे यांच्या मदतीवर विश्‍वास नसावा. राहुरीच्या डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्यात विखे-कर्डिले युती होते, यामागचं कारण विखे यांच्या उपद्रवक्षमतेचा फटका बसू नये, हेच असतं. राहुरी तालुक्‍यात विखे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याच्या मदतीशिवाय नगर-राहुरी मतदारसंघाचा गड सर करता येणार नाही, याची कर्डिले यांना पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळं विखे यांचं कौतुक करण्याशिवाय त्यांच्यापुढं पर्याय नसतो. ही पार्श्‍वभूमी एकदा विचारात घेतली, की स्वपक्षीय खासदाराच्या विरोधात कर्डिले का भूमिका घेतात, याचं गणित समजू शकतं.

#न्यू_विंडो : मर्यादाभंग केला, की अवमान ठरलेलाच (भाग २)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)