#न्यू_विंडो : मर्यादाभंग केला, की अवमान ठरलेलाच (भाग २)

#न्यू_विंडो : मर्यादाभंग केला, की अवमान ठरलेलाच (भाग १) 

-भागा वरखडे

राजकीय पक्षांची कार्यपद्धती ठरलेली असते. कुणी कशावर आणि केव्हा भाष्य करावं, याचे काही संकेत असतात. ते पाळले, की राजकीय नेता, कार्यकर्ता अडचणीत येत नाही; परंतु राजकीय नेत्याची जिभ एकदा सैल सुटली, की मग त्याविरोधात प्रतिक्रिया उमटतात. पक्षातून जाब विचारला जातो. कधी कधी पक्ष संबंधित नेत्याच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष करतो.

नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. पक्षाची उमेदवारी जाहीर करण्याचं काम केंदीय संसदीय समिती करीत असते. कर्डिले यांच्यासारख्या नेत्याला ते माहीत नाही, यावर कुणाचाही विश्‍वास बसणार नाही. खा. गांधी यांचं काम पाहून, सर्वेक्षणाचा आधार घेऊन उमेदवार बदलायचा, की तोच ठेवायचा, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. तो अधिकार कर्डिले यांचा नक्कीच नाही. या पार्श्‍वभूमीवर कर्डिले यांनी एकदा नव्हे, तर अनेकदा पद्मश्री विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांना उमेदवारीसाठी पायघड्या घातल्या. आपल्याच पक्षाचा खासदार सध्या संसदेत असताना इतर पक्षाच्या नेत्याला खासदारकीसाठी मदत करायची, ही भूमिका पक्षविरोधीच आहे. बरं विखे अजून भाजपत आलेले नाहीत. आले, तरी त्यांना उमेदवारी द्यायची, की नाही, याचा निर्णय अजून झालेला नाही. अशा वेळी वारंवार त्यांना चुचकारण्यामागचा हेतू स्वच्छ नाही.

डॉ. विखे यांनी गेल्या काही महिन्यांपासून दक्षिणेतला संपर्क कमी केला आहे. त्यांची आरोग्य शिबिरं थांबली आहेत. असं असताना त्यांना खासदारकीचं स्वप्न कर्डिले का दाखवीत असावेत? कर्डिले यांच्यासारखीच स्थिती पांडुरंग अभंगाची झाली आहे. कर्डिले तरी किमान राजकीय स्वतः च्या राजकीय फायद्यासाठी डॉ. विखे यांचा पुरस्कार करीत आहेत. अभंगाचं तसं नाही. अभंग हे स्वयंप्रकाशी नेते नाहीत. मारुतराव घुले यांची सावली म्हणूनच ते वावरले. आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मारुतरावांनी अभंगांचा वापर केला. राष्ट्रवादीनंही त्यांना वारंवार वेगवेगळी पदं दिली. जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदासह संघटनात्मक पदं दिली. त्यांचा सन्मान केला. अभंग हे वादग्रस्त वक्तव्यं करण्याबाबत कधीच कुप्रसिद्ध नाहीत. त्यांना त्यांच्या मर्यादा चांगल्याच माहीत आहेत. असं असताना त्यांनी नगर लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्याची भाषा वापरावी, हे जरा अतीच झालं.

नगर लोकसभा मतदारसंघावरचा हक्क राष्ट्रवादी कदापि सोडणार नाही, असं सर्वंच नेते घसा फुटेपर्यंत ओरडून सांगत असताना अभंग यांनी त्यांच्याविरोधात सूर आळवावा, याला काय म्हणावं? लोकसभेच्या उमेदवारीबाबत अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासारखे पवार यांच्या कुटुंबातले सदस्य बोलत नाहीत. शरद पवार यांचा तो अधिकार असल्याचं सर्वंच नेते सांगतात. असं असताना राष्ट्रवादीची जागा कॉंग्रेसला सोडण्याची भाषा त्यांनी का वापरावी, यांचं कोड सुटत नाही. नगर लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडावा, असा विखे यांच्यासह अन्य कॉंग्रेसजणांचा आग्रह आहे. या मतदारसंघात कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. राहुरीत विखे यांचं थोडं वजन आहे, इतकंच. पारनेरमध्ये नंदकुमार झावरे, श्रीगोंद्यात शिवाजीराव नागवडे, कर्जतमध्ये अंबादास पिसाळ, शेवगावमध्ये ऍड. हर्षदा काकडे आदींवर त्यांची भिस्त आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा या मतदारसंघात दोनदा पराभव झाला असला, तरी त्याला वेगवेगळी कारणं आहेत. बंडखोरी हे त्याचं कारण आहे.

राष्ट्रवादीचे या मतदारसंघात दोन आमदार आहेत. असं असताना राष्ट्रवादीनं या मतदारसंघावरचा दावा का सोडावा? शिर्डी लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे तीन आमदार असताना त्यांनी हा मतदारसंघ का सोडावा? शिर्डी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा एकच आमदार असताना कॉंग्रेसनं तो राष्ट्रवादीला घेण्याचा आग्रह का धरावा, या प्रश्‍नांची उत्तरं मिळत नाहीत, तोपर्यंत हा तिढा दोन्ही पक्षपातळीवर सुटणार नाही. दोन्ही कॉंग्रेसचं जागावाटप अजून झालेलं नाही. राहुल गांधी आणि शरद पवार यांना दोन्ही कॉंग्रेसचं जागावाटप आणि उमेदवार ठरविण्याचा अधिकार आहे, तर भाजपत पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाच उमेदवार ठरविण्याचा अधिकार आहे. असं असताना कर्डिले व अभंग मर्यादाभंग करीत आहेत.

कर्डिले यांचं ज्येष्ठत्त्व लक्षात घेऊन उघडपणे त्यांच्याविरोधात जाहीरपणे कुणी बोललं नसलं, तरी काहींनी पक्षाकडं तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. अभंग यांचे राजकीय आश्रयदाते नरेंद्र घुले यांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत असताना त्यांनी नगर लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्याची भाषा करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. त्यामुळं तर पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे यांच्यासारख्यांना अभंग यांना त्यांची जागा दाखवावी लागली. अभंग यांच्या वक्तव्याला काडीचीही किमंत नाही, असं सांगावं लागलं. यातून अभंग यांनी स्वतः ची किमंत कमी करून घेतली. मर्यादाभंग केला, की असा अवमान वाट्याला येतो, हा धडा कर्डिले, अभंग यांच्या उदाहरणातून अन्य नेत्यांनी घेतला, तरी पुरेसं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)