
कोपरगाव – राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळळी असून, दररोज जमावाकडून मारहाणीच्या घटना घडत आहेत. स्त्रिया, मुले, अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढले आहेत. अल्पवयीन मुलींवर बलात्कार, या गोष्टी नित्याच्या झाल्या आहेत. लोकशाही आणि न्यायाच्या एकात्मतेबद्दल सामान्य माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असून, त्याबद्दल राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसला चिंता वाटत आहे. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस शासनाचा निषेध करीत असून, राज्यपालांनी यात लक्ष घालावे, अशा मागणीचे निवेदन कोपरगाव तालुका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने राज्यपाल विद्यासागर राव यांना संविधान दिनानिमित्त देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष नगरसेविका प्रतिभाताई शिलेदार, युवती अध्यक्षा स्वप्नजा वाबळे, नगरसेविका माधवी वाकचौरे, सविता होन, प्राप्ती वढणे, कल्पना मेढे, ऐश्वर्या वढणे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
निवदनात म्हटले आहे की, नागरिकांनी कायदा हातात घेण्याची वाढत असलेली प्रवृत्ती, औरंगाबादमधील पूर्व नियोजित दंगली, तसेच संसदेच्या एका सन्माननीय सदस्यांनी केलेले प्रक्षोभक वक्तव्य, यामुळे साहजिकच द्वेषभावना पसरवण्याचे काम केले जात आहे. राज्यात शांतता व न्यायाचे वातावरण सुनिश्चित करावे. जेथे समता, एकता, बंधुता आणि न्याय या संवैधानिक मूल्यांचा आदर व्हावा, यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी नायब तहसीलदार गोसावी यांनी निवेदन स्वीकारले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा