खासदार गांधी ‘भाजप’पेक्षा ‘राष्ट्रवादी’चे जास्त

शिवसेनेचे अनिल राठोड यांची टीका : उड्डाणपुलाचे काम भाजपमुळेच रखडले

मुख्यमंत्री, महसूलमंत्री घरातून पैसे देतात का?

महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने पुलासाठी पैसे दिले नाहीत, या आरोपाचे खंडण करताना अनिल राठोड यांनी मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्यावर देखील टिकाचा हल्ला चढविला. राज्य सरकारने पुलासाठी 50 कोटी मंजूर केले आहेत, ते मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनी स्वतःच्या खिशातून दिलेत का? हे पैसे जनतेचे आहेत. जनतेने कर रुपाने दिलेला पैसाच सार्वजनिक कामासाठी वापरला जातो आहे. त्यामुळे श्रेय घेण्याचे कारणच उतरत नाही. पुलाअगोदरच टोल वसुली सुरू झाली आहे. यात नक्कीच काही गडबड आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी अनिल राठोड यांनी केली.

नगर – ‘खासदार दिलीप गांधी हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हे अगोदर त्यांनीच निश्‍चित करावे. नगरमधून जाणाऱ्या उड्डाणपुलाबाबत आतापर्यंत त्यांनी पाचवेळा नारळ फोडला. परंतु एकही खांब उभा करण्यात त्यांना यश आले नाही. ते खोटे बोलून नगरकांना मूर्ख बनविण्यात तरबेज आहेत,’ अशी घाणाघाती टीका शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातून जात असलेल्या उड्डाणपुलाचे काम महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेमुळे रखडल्याची टिका खासदार दिलीप गांधी यांनी केली होती. राठोड यांचे या टिकेवर पत्रकारांनी विचारले असता, खासदार गांधी यांच्या भूमिकेचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

राठोड म्हणाले, “खासदार गांधी हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, की नाही त्यांनी ठरवावे. भाजपचा हा खासदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असल्याचे नगरकरांना दिसते आहे. भाजपचे वरिष्ठ नेते उड्डाणपुलाबाबत वेगळे सांगतात, आणि खासदार गांधी यांची भूमिका वेगळी असते.’ उड्डाणपुलाची पहिली निविदा मंजूर झाली होती. त्याचे कामही सुरू झाले होते. ते काम थांबवून कामगारांना मारहाण झाली. पळवून लावले. यातून काम रखडले गेले आणि कामाची रक्कम वाढली. हा उड्डाणपूल व्हावा यासाठी आमदार असताना शिवसेनेने तीन दिवस उपोषण केले होते. त्यावेळी कोणीही पुढे आले नाही. भारतीय जनता पक्षालाच उड्डाणपूल नको आहे, असेही ते म्हणाले.

या उड्डाणपूल जेथून जात आहे, तेथील जमिनी, हॉटेल कोणाचे आहेत, हे नगरकरांना चांगलेच माहित आहे. उड्डाणपुलात हे जाऊ नये म्हणून भाजपच त्याचे संरक्षण करत आहेत, असाही टोला त्यांनी मारला. या उड्डाणपुलाअभावी अनेकांना आपले जीव गमावावे लागले आहेत. अनेक कुटुंब निराधार झाले आहेत. “साहेब’ यावर कोणतीही भूमिका घेत नाहीत, हे दुर्दैवी आहे. भाजपच्या कोणत्याही आरोपाला प्रत्त्युतर देण्याची शिवसेना ताकद ठेवते, असेही राठोड म्हणाले.

हा उड्डाणपूल व्हावा यासाठी भाजपच्या या “साहेबांनी’ पाचवेळा नारळ फोडला. प्रत्यक्षात मात्र एकाही खांब उभा राहिलेला नाही. महापालिकेने सात कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. तसा ठरावही घेतला आहे. पहिल्यापासून उड्डाणपुलाच्या समर्थनात असलेली शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्‍न निर्माण होतोच कोठे? असेही ते म्हणाले.

शशिकांत गाडेंची देखील खा. गांधींवर टीका

शिवसेनेचे नगर दक्षिणप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी देखील खासदार दिलीप गांधी यांच्या भूमिकेवर टीका केली. वडगावगुप्ता (ता. नगर) येथील विमानतळाची जमीन आणि दौंड-मनमाड रस्त्याचे दुहेरीकरण कोणामुळे रखडले याचे खासदार गांधी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. खासदार गांधी नगरकरांची दिशाभूल करण्यात तरबेज आहेत. खोटे बोलून लोकांना मूर्ख बनविण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही, असेही बोचरी टीका गाडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)