गड जायची वेळ आली, तेव्हा मला जाग : महंत नामदेवशास्त्री

 सामान्यांच्या ‘पै-पै’ नेच केली गडाची उभारणी

कामगारांना जगविण्यासाठी कारखाना भाडेतत्त्वावर

सत्तेने व पैशाने सर्व गोष्टी होत नाहीत. केवळ कामगार जगविण्यासाठी कारखाना भाडेतत्वावर चालविण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे सांगत केदारेश्‍वर रोज किमान पाच हजार टनांप्रमाणे गाळप करुन या हंगामात पाच लाख टन ऊस गाळप करणार असल्याची माहिती ऍड. प्रताप ढाकणे यांनी दिली.

शेवगाव – कारखाना हातचा जायची वेळ आली, तेव्हा प्रतापला जाग आली. तसेच गड जायची वेळ आली, तेव्हा मला. मात्र प्रतापच्या मागे माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांची, तर माझ्या मागे साक्षात बाबांची ताकद होती, म्हणूनच गड शिल्लक राहिला. अन्यथा भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळासारखी गडाची अवस्था झाली असती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामान्य लोकांनी पै-पै देऊन पंधरा वर्षांत गड मोठा केला. मात्र ते स्वीकारण्याची काहींची मानसीक तयारी नाही, अशी खंत भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता व्यक्त केली.

तालुक्‍यातील बोधेगाव येथील केदारेश्वर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे व शेतकरी त्रिंबक चेमटे यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून नामदेवशास्त्री बोलत होते. यावेळी केदारेश्वरचे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे, आपेगाव संस्थानचे महंत भानुदास महाराज कोल्हापूरकर, केदारेश्‍वरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्‍विनकुमार घोळवे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे, जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे, तज्ज्ञ संचालक हृषीकेश ढाकणे, प्रभाकर हुंडेकरी, भाऊराव भोंगळे, मयूर हुंडेकरी, ऍड. संजय सानप, कार्यकारी संचालक रमेश गर्जे आदी प्रमुख उपस्थित होते.

नामदेवशास्त्री म्हणाले, भगवानगड हा लोकांच्या देणगीतून मोठा झालेला आहे. कोणा एकाच्या योगदानातून नाही. बाबांच्या गादीची ताकद अशी आहे की, जी माणसं घडवू शकते ती माणसे संपवू ही शकते. केदारेश्‍वरमध्ये दारू निर्माण केली जाऊ नये, तर इथेनॉल तयार करण्यात यावे. घरातील माणसांची किंमत कळाली की दुसऱ्याला किंमत देण्याची गरज राहात नाही. भगवान बाबा शिक्षण प्रसारक संस्थेसारखे हाल गडाचे होऊ नये, म्हणून आपण गडावरचे राजकारण बंद केले.

गड कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. पण लोक बाबांची आणि स्वतःची ताकदही मानायला तयार नाहीत. आपण परमार्थीक जगात वावरणारे असल्याने आपल्याला व्यावहारिक जग समजत नाही. त्यामुळे काही चुका जरूर घडल्या असतील. पण आता पुढच्या सुज्ञ आणि व्यावहारिक पिढीवर आपला विश्वास आहे, असे सांगून हंगामास शुभेच्छा दिल्या.

माजी मंत्री ढाकणे म्हणाले, राज्यात 38 साखर कारखाने आतबट्ट्याच्या व्यवहारामुळे विकले गले. केदारेश्‍वरही विकला जावा, म्हणून अनेक जण देव पाण्यात घालून बसले होते. येथे 2003 च्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री व विरोधी पक्षनेते यांच्या तीन लालदिव्याच्या गाड्या तळ ठोकून होत्या. तरीही ऊसउत्पादकांनी आम्हाला बहुमताने विजयी केले. एवढा विश्वास दाखवणाऱ्यांचा विश्वासघात कधीच करणार नाही. ऍड. ढाकणे, कोल्हापूरकर, घोळवे, कराळे आदींची भाषणे झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)