उमेदवारांचा वेळ खर्च होतोय विविध परवाने मिळविण्यासाठीच
नगर – महापालिका निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत 27 नोव्हेंबरला होती. त्यामुळे त्याच दिवशी निवडणूक रिंगणात कोण, याचे चित्र स्पष्ट झाले होते. तेव्हापासूनच उमेदवारांची विविध परवाने मिळविण्यासाठी धावपळ सुरू होती. मात्र आज चार दिवस होऊनही महापालिकेतर्फे उमेदवारांना परवाने देण्याची कुठलीच व्यवस्था नसल्याने अद्यापही प्रचाराचे भोंगे बंदच आहेत.
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारास प्रारंभ झाला आहे. 27 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी अनेकांनी अर्ज मागे घेतले. त्याच दिवशी निवडणूक रिंगणात कोण असले, याचे चित्र स्पष्ट झाले. आपली उमेदवारी नक्की झाल्याने उमेदवारांनी घरटू घर प्रचारास त्याच दिवशी प्रचार सुरू केला. मात्र प्रचार वाहन, बॅनर, पत्रके वाटण्यासाठी असलेले परवाने अद्यापही या उमेदवारांना न मिळाल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. मागील चार दिवसांपासून हे उमेदवार प्रचारासाठी लागणारे परवाने मिळविण्यासाठी महापालिका कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र महापालिकेकडून अद्यापही कुठलीच व्यवस्था न करण्यात आल्याने प्रचार सुरू होऊन चार दिवस उलटूनही अद्यापही त्यांना जाहीर प्रचार सुरू करता आलेला नाही.
याबाबत माजी आ. अनिक राठोड यांनी राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त जगेश्वर सहरिया यांना याबाबत निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदीही उपस्थित होते. यावेळी राठोड यांनी निवडणूक प्रचाराचे परवाने घेण्यासाठी उमेदवारांना महापालिका कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे, अशी तक्रारही केली.
शहरात आदर्श आचारसंहिता अवलंबिताना उमेदवारांना त्याचा त्रास होत आहे. उमेदवारांसाठी एक खिडकी योजना आखली. मात्र त्याचा बोजवारा उडाला आहे. उमेदवारांना प्रचारापेक्षा परवाने घेण्यातच वेळ खर्च करावा लागत आहे. ठराविक पक्षांना उशिराने परवाने दिले जात आहेत. त्यामुळे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मेटाकुटीस आल्याचेही राठोड यांनी सहरिया यांच्या निदर्शनास आणून दिले.
उमेदवारांना परवाने मिळत नसल्याने अद्यापही प्रचाराला पाहिजे तसा वेग आलेला नाही. तसेच प्रचारांच्या गाड्यांवरी भोंगे अद्यापही बंद असल्याने निवडणुकीचा माहोल अद्यापही तयार झालेला नसल्याचे चित्र दिसत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा