जिल्ह्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांवरील हल्ले वाढले

कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना सहकार्य करा : सांगळे

नगर – नगरमंडळ कार्यालयांतर्गत थकीत वीजबिलाची वसुली व वीजचोरीला अटकाव करणाऱ्या महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ करण्याच्या तब्बल बारा घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. संबंधितांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल झाले असून हल्लेखोर व्यक्‍तींविरोधात कठोर कारवाई व्हावी, यासाठी महावितरण पाठपुरावा करत आहे. या पार्श्‍वभूमीवर कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी केले आहे. दरम्यान, मनोधैर्य खचू न देता अशा अपप्रवृत्तींविरुद्ध एकत्रितपणे उभे राहण्याच्या सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

-Ads-

जिल्ह्यात वीजचोरीला प्रतिबंध व थकबाकी वसुली मोहिम राबविणाऱ्या पथकातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात नेवासे तालुक्‍यातील तेलकुडगाव, देवगाव व चांदे, पाथर्डी तालुक्‍यातील आडगाव, मिरी व हनुमान टाकळी, नगर तालुक्‍यातील चिचोंडी पाटील, संगमनेर तालुक्‍यातील सुकेवाडी, आश्वी, राहुरी तालुक्‍यातील वांबोरी येथे कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. संबंधित हल्लेखोरांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल झाले असून कठोर कारवाईसाठी पाठपुरावा सुरु आहे.

महावितरण ही अत्यावश्‍यक सेवा पुरविणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमविणे हा कंपनीचा उद्देश नाही. मात्र वितरित केलेल्या प्रत्येक युनिट विजेच्या बिल वसुलीवर कंपनीचे अस्तित्व अवलंबून आहे. वीजचोरी व वीजबिलाच्या वाढत्या थकबाकीमुळे कंपनीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्तव्याचा भाग म्हणून वीज पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी अविरत सेवा देणारा वीज कर्मचारी वसुली व वीजचोरीला अटकाव करताना मात्र, काही समाजकंटकांच्या रोषाला नाहक बळी पडतो. काही तक्रार असल्यास ती कायदेशीर मार्गाने उपस्थित करण्याऐवजी कायदा हातात घेऊन कर्मचारी वेठीस धरले जातात. यातून कर्मचाऱ्यांचे मनोबल खचून ग्राहक सेवा व दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होतो.

अशा समाजकंटकाविरोधात पोलिसात फिर्याद देऊन शिक्षा होण्यासाठी आवश्‍यक पाठपुरावा करण्याच्या मुख्य अभियंता कार्यालयाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सांगळे यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत. तर अशा घटना घडू नयेत, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)