सवलतीची मागणी : आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी पुढाकार

नगर – कोपर्डी अत्याचाराच्या घटनेनंतर सकल मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढून समाजाच्या ज्वलंत प्रश्‍नावर आवाज उठवला. मराठा विद्यार्थ्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विविध सवलतींची आग्रही मागणी सरकारकडे लावून धरली असून, 50 टक्के शिक्षण शुल्क माफीपासून वंचित मराठा-ईबीसी विद्यार्थ्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाची उद्या जिल्हाव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सरकारने मराठा समाजाच्या मागणीनुसार केवळ मराठाच नाही, तर आर्थिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांसह जवळपास सहाशे अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण शुल्कात 50 टक्के माफीचा आदेश काढला. 8 लाख रुपये मर्यादेच्या आत उत्पन्न असलेल्या मराठा-ईबीसी विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ घेता येईल, अशी या जीआरमध्ये तरतूद आहे. त्यानुषंगाने सर्व विद्यापीठांना अंमलबजावणीसाठी परिपत्रके जारी करण्यात आली आहेत. मात्र, तरीही महाविद्यालये व शिक्षण संस्था निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

याबाबत वंचित मराठा व ईबीसी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी दुपारी 1 वाजता तहसील कार्यालय येथे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हाव्यापी बैठक आयोजित केली आहे. ही बैठक तहसील कार्यालय येथे सकल मराठा समाजाचे वतीने सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलन मंडपात घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतून प्रवेशित वंचित, गरजू विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

शुल्क माफीच्या सवलतीकडे सरकारचे दुर्लक्ष

50 टक्‍के अर्थात निम्मे शिक्षण शुल्क घेऊनच पात्र ईबीसी विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी प्रवेश मिळाला पाहिजे. मात्र, सरळ सरळ सरकारी आदेश धुडकावला जात आहे. सरकारच्या या आदेशाची महाविद्यालये, संस्था, तसेच विद्यापीठांकडून योग्य प्रकारे कार्यवाही होत नाही. यामुळे मराठा-ईबीसीधारक विद्यार्थी 50 टक्‍के शिक्षण शुल्क माफीच्या सवलतीपासून वंचित राहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)