नगर: शिवसेनेने आज तिसरी यादी जाहीर केली. त्यात 19 जणांचा समावेश आहे. जुन्या शिवसैनिकांसह युवक कॉंग्रेसमधून फुटून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. ही तिसरी यादी जाहीर करून, शिवसेने आतापर्यंत 51 जणांची नावे निश्चित केली आहेत. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, दक्षिणप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम आदी यावेळी उपस्थित होते.
हेलन ऍलेक्स पाटोळे, दमयंती रावजी नांगरे, भास्कर मारूती पांडुळे, संगीता भारत केरूळकर, बलराम अशोक सचदेव, सारिका हनुमंत भुतकर, पुष्पा निवृत्ती वाकळे, जयश्री बाबासाहेब सोनवणे, कविता अशोक दहिफळे, गौरव अरविंद ढोणे, अरुणा नरेंद्र गोयल, सुनीता सतीश मैड, शांताबाई दामोदर शिंदे, सुनीता संजय कोतकर, विजय मोहन पठारे, ज्ञानेश्वर ऊर्फ अमोल शिवाजी येवले, सुभाष पिराजी कांबळे, मनीषा सोपान कारखेले व शैलेशकुमार गांधी या 19 जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राठोड म्हणाले, “शिवसेनाविरुद्ध सर्व पक्ष असे सध्या निवडणुकीचे चित्र आहे. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीचे काम सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेचाच महापौर महापालिकेत दिसेल.
‘शेवटची यादी जाहीर करणे बाकी आहे. ती दोन दिवसांत जाहीर होईल. तीन याद्या जाहीर करून शिवसेनेने आतापर्यंत 51 उमेदवार निश्चित केली आहेत. उर्वरीत 17 जणांची यादी दोन दिवसात जाहीर केली जाईल. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संपर्कात आहे. शिवसेनेत ते प्रवेश करू इच्छितात. काही दिवसात हेही चित्र स्पष्ट होईल, असेही राठोड यांनी सांगितले.
मतदारांसाठी भाजप-सेना युती
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे मतदार बहुतांशी आहे. महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती नसली, तरी मतदारांसाठी ही युती कायम आहे. मतदारांचे विभाजन होऊ नये म्हणून, भाजपचे अनेक नेते संपर्कात आहेत. नगर शहरासाठी मतदारांची ही युती शेवटपर्यंत राहणार आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे मतदार देखील आमचेच आहे, असा दावा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगांवकर व उपनेते अनिल राठोड यांनी केला.
युतीचे गुऱ्हाळ पक्षश्रेष्ठींकडे
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीचे गुऱ्हाळ स्थानिक पातळीवर राहिलेली नाही, हे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगांवकर आणि उपनेते अनिल राठोड यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने तीन, भाजपने एक यादी जाहीर केली आहे. तरी देखील युती होईल का, असा प्रश्न होत आहे. युतीचे गुऱ्हाळ आता शिवसेना भवनातील पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्यानुसार आम्ही कार्यवाही करू, असे स्पष्ट मत अनिल राठोड यांनी व्यक्त केले.
योगीराज-विक्रम खरे लढवय्ये!
दहशत आणि गुंडगिरीचा जिथे प्रश्न येतो, तिथे शिवसेना मागे हटत नाही. जिथे कोणी लढण्यास तयार होत नाही, तिथे योगीराज गाडे आणि विक्रम राठोड यांना उभे केले जाते. “शिवसेनेत घराणेशाही नाही. जिल्हा परिषदपासून ते नगरपालिकांपर्यंत सर्व काही आम्हालाच, असे शिवसेनेत चालत नाही,’ असेही उपनेते राठोड यांनी सांगितले.
तडीपारींच्या कार्यवाहीवर न्याय्य लढा
कायदा व शांतता भंग न होण्याच्या दृष्टिने प्रशासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपारींच्या नोटिसा बजाविण्यास सुरूवात केल्या आहेत. याविरोधात कसा संघर्ष करणार, या प्रश्नावर शिवसेनेला न्याय मागता येतो, असे उपनेते अनिल राठोड यांनी सांगितले. राठोड म्हणाले, “प्रशासनाचा राजकीय वापर होत आहे. गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी किरकोळ गुन्हे असणांऱ्यावर कारवाई होत आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही.‘
छिंदमबाबत त्यांच्याच समाजाने ठरवावे
श्रीपाद छिंदम हा शिवद्रोही निघाला आहे. यात त्याच्या समाजाची चूक नाही. छिंदमसारख्या प्रवृत्तीमागे त्याचा समाज जाणार नाही. त्याच्या निवडणुकीबाबत त्याच्याच समाज ठरविल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजापुढे छिंदमची प्रवृत्ती नष्टच होईल. छिंदमसारख्या प्रवृत्तीविरोधात आमची लढाई आहे, तर कोण्याएकासमाजाविरोधात नाही, असे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगांवकर आणि उपनेते अनिल राठोड यांनी यावेळी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा