नगर महापालिका रणसंग्राम: केडगावमध्येही कॉंग्रेसचे अस्तित्व संपुष्ठात 

 कोतकर समर्थक पाच उमेदवारांनी हातात घेतले कमळ ; कॉंग्रेसला ऐनवेळी करावे लागले उमेदवार आयात 

नगर: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात जोरदार उलथापालट झाली असून सर्वच राजकीय पक्षाची समिकरणेच बदलली आहेत. कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या केडगाव उपनगरावर भाजपने घाला घालून कॉंग्रेसच पूर्णपणे उद्धवस्त केली. कॉंग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर समर्थक असलेल्या पाचही कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अचानक पक्षाची उमेदवारी नाकारून भाजपचे कमळ हातात घेतले. या आठ जणांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ऐनवेळी कॉंग्रेसला उमेदवार आयात करावे लागले. भाजपमधील नाराजांना कॉंग्रेसला उमेदवारी द्यावी लागली.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ही घडामोड चालू होती. एकीकडे आघाडीत राष्ट्रवादीबरोबर कॉंग्रेसचे नेते चर्चा करीत असतांना दुसरी कोतकर समर्थकांबरोबर भाजपची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादीसह कॉंग्रेसच्या नेत्यांनी भानुदास कोतकर याला गृहीत धरून बोली केली. परंतू कोतकर याने सोमवारपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली होती. विशेष म्हणजे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या रविवारी झालेल्या संयुक्‍त पत्रकार परिषदेत कोतकराचे दोन समर्थक उपस्थित होते.

कॉंग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे यांच्याबरोबरच हे समर्थक आले होते. सोमवारी रात्री उशीरा कोतकर याच्या आदेशानंतर केडगावमध्ये चांगलीच उलथापालट झाली. आघाडीत केडगावमधील प्रभाग क्रमांक 16 व 17 या दोन्ही प्रभागातील आठही जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आल्या होत्या. कोतकर याने निश्‍चित केलेल्या आठ उमेदवारांच्या नावाने पक्षाने “एबी’ फार्म तयार केले होते. परंतू आज सकाळी या आठही उमेदवारांनी कॉंग्रेसची उमेदवारी नाकारली. त्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली.

कोतकर याच्या आदेशानंतर केडगावमधील राजकीय समिकरण बदलले. कालपर्यंत कॉंग्रेसमध्ये असलेले आणि उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतरही अचानक त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देवून भाजपची उमेदवारी स्वीकारल्याने केडगाव आता कॉंग्रेस पूर्णपणे संपुष्ठात आली आहे. कॉंग्रेसला उमेदवार अक्षरशः आयात करावे लागले. गेल्या चार ते पाच दिवसांपूवी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपवासी झालेल्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते आता पक्षावर नाराज झाले आहे. त्यापैकी काहींना उमेदवारी देण्याची नामुष्की कॉंग्रेसवर ओढावली आहे.

 भाजपची 16, 17 प्रभाग वगळून यादी जाहीर 

केडगावमधील राजकीय भूकंपामुळे शहराला जोरदार हादरा बसला आहे. कोतकर समर्थक आठ उमेदवारांनी भाजपची उमेदवारी घेतली आहे. असे असले तरी कोतकर समर्थक पाच उमेदवार भाजपमध्ये गेले असून उर्वरित तीन जागा खा. गांधी गटाला देण्यात आल्याची चर्चा होती. त्यात भाजपने सायंकाळी 16 व 17 हे केडगावचे दोन प्रभाग वगळून सर्वच प्रभागांची उमेदवार यादी जाहीर केली. त्यामुळे नेमके कोतकर समर्थक किती भाजपमध्ये गेले हे समजू शकले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
1 :heart:
20 :joy:
3 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)