नगर : उमेदवारांच्या आर्थिक व्यवहारावर निवडणूक यंत्रणेचा वॉच

नगर – लोकसभा निवडणूक काळात राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह त्यांचे निकटचे नातेवाईक यांच्या बॅंक खात्यांवर आता निवडणूक आयोगाची नजर राहणार आहे. यासोबतच इतर खात्यातूनही होणाऱ्या व्यवहारांवर आता लक्ष ठेवण्यात येणार आहे. संशयास्पद व्यवहाराची माहिती बॅंकांनी तत्काळ निवडणूक यंत्रणेला देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज जिल्ह्यातील बॅंकांच्या जिल्हा व्यवस्थापकांची बैठक झाली.

दहा लाखांच्या व्यवहारांवर आयकरची नजर

निवडणूक काळात एटीएममध्ये भरणा करणाऱ्या वाहनांसोबत अधिकृत पत्र असेल, याची खातरजमा बॅंकांनी करावी. तसेच संबंधित वाहन, संबंधित वाहनचालक आणि सदर रक्कमेबाबत अधिकृतता पटवून देईल, अशी कागदपत्रे सोबत ठेवण्याच्या सूचना बॅंकेच्या जिल्हा व्यवस्थापकांना दिल्या. दहा लाखांच्या पुढील व्यवहारांबाबतची माहिती आयकर खात्याला तत्काळ कळवावी, असे ते म्हणाले.

या अधिकाऱ्यांना खर्चविषयक नियमांची आणि आयोगाने घालून दिलेल्या नियम आणि सूचनांची माहिती दिली. अपर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, खर्चविषयक सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत वनारसे, कोषागार अधिकारी महेश घोडके, महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील लेखा अधिकारी विजय कोते आणि विविध मतदारसंघनिहाय नियुक्त करण्यात आलेले सहायक खर्च निरीक्षक उपस्थित होते.

बॅंकेतून नेहमीपेक्षा कोणत्या खात्यातून जास्त किंवा एकदम कमी व्यवहार होत असतील, तर त्याची माहिती तात्काळ खर्चविषयक समितीच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे. निवडणूक लढवून इच्छिणाऱ्या प्रत्येकाने अर्ज भरण्यापूर्वी एक दिवस अगोदर त्यांचे नवीन बॅंक खाते उघडणे आवश्‍यक आहे. निवडणूकीसाठीचा खर्च त्या बॅंक खात्यातूनच केला जाणे आवश्‍यक असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

निवडणूकीसाठीच्या खर्चासाठी उमेदवारांनी स्वतंत्र खाते उघडले तरी त्याच्या इतर खात्यांवर आणि त्यामधून होणाऱ्या व्यवहारांवर बॅंकांनी नजर ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. निवडणूक काळात पैसे वाटपाचे विविध प्रकार करण्याची शक्‍यता लक्षात घेऊन, अशा बॅंक खात्यातून इतरांच्या वेगवेगळ्या बॅंक खात्यांवर रक्कमा जमा होत असतील, तर त्याचाही शोध घ्यावा आणि संबंधितांकडून माहिती घ्यावी, असे ते म्हणाले. उमेदवारांव्यतिरिक्त एखाद्या राजकीय पक्षाचे बॅंक खाते असेल, तर त्याच्या व्यवहारांवरही लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)