नेवासे : युतीमुळे अनेक इच्छुकांची स्वप्ने भंगली

नेवासे – लोकसभेसह विधानसभा निवडणुकांसाठी भाजप- शिवसेना युतीची घोषणा झाल्यामुळे दोन्ही पक्षांच्या मत विभाजनाचा प्रश्न मिटला आहे. वरकरणी युतीबाबत शिवसेनेसह भाजपच्या पदाधिकाऱ्यामध्ये समाधान व्यक्‍त होत असले तरी स्वबळाच्या नाऱ्यामुळे लोकसभा व विधानसभेच्या तयारीला लागलेल्या अनेक इच्छुकांची स्वप्ने मात्र आता भंगली आहेत. गेल्या चार वर्षांपासून राज्यपातळीवर भाजप व शिवसेनेत सुरू असलेला संघर्ष हा स्थानिकपातळीवर दिसून आला होता. सरकारच्या विरोधात भूमिका घेणारी शिवसेनेने कर्जमाफीसह अनेक मुद्‌द्‌यावर थेट रस्त्यावर येऊन सरकारला आव्हान दिले.

नेवाशात हि हेच चित्र होते. त्यामुळे नगरपंचायत असो की जिल्हा परिषद भाजपने शिवसेनेला युतीबाबत साधी विचारणाही न करता निवडणुका लढवत पायात-पाय घोटाळले होते. शिर्डी लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात सध्या शिवसेनेचा एकही आमदार नाही. खासदार शिवसेनेचा आहे. परंतू त्यांनी मतदार संघातील अनेक गावे अजूनही पहिले नसल्याने लोकसभेसाठी युती झाली हे बरेच झाले असा सुटकेचा श्वास अनेकांनी टाकला. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची सर्व मोर्चेबांधणी कोलमडली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभा निवडणुकीसाठी नगर दक्षिण मतदार संघ भाजपकडे तर उत्तर शिवसेनेकडे आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात भाजप व शिवसेनेकडून विद्यमान खासदारासह अनेकांनी जोरदार तयारी सुरु केली होती. विविध विकासकामांच्या उद्‌घाटनाच्या माध्यमातून इच्छूक पुढे आले होते. परंतू आता युतीमुळे या इच्छुकांचा उत्साह मावळला आहे.

लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने भाजपच्या अनेक इच्छुकांनी जोरदार तयारी केली होती. त्यात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नितिन उदमले यांच्यासह अनेक इच्छुक होते. त्याबरोबर विधानसभेसाठी देखील शिवसेनेतील अनेकांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. आपण आता उमेदवार म्हणून आतापर्यंत दोन पाच लाख खर्च देखील केला आहे. विविध कार्यक्रम राबवून स्वतः प्रचार व प्रसार केला आहे. परंतू या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आता युतीची घोषणा केल्याने या इच्छुकांच्या तयारीवर पाणी पडले आहे.

सन 2014 मध्ये दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढतील. त्याप्रमाणे आताही स्बळावर लढवतील, अशी आशा या इच्छुकांना वाटत होती. परंतू अचानक युतीचा निर्णय घेण्यात आल्याने हे इच्छुक भांबावले आहेत. त्यामुळे आता संभाव्य मित्रपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराबाबत देखील प्रश्‍न चिन्ह उभे राहण्याची शक्‍यता आहे.

आता शिवसेनेचा फायदा होणार का?

2009 च्या निवडणुकीत भाजप- शिवसेनेची युती असताना अकोले, कोपरगाव व राहाता हे तीन मतदार संघ सेनेला मिळाले होते. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला ऐनवेळी स्वबळाची तयारी करावी लागली होती. त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. निवडणुकीनंतर पुन्हा शिवसेना व भाजपची युती होऊन सेना सत्तेत सहभागी झाली असली तरी सेना सत्तेत असल्याचे कुठेही जाणवले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)